पिंपळगाव, सोनारा परिसरात दमदार पाऊस

By Admin | Updated: June 22, 2016 23:52 IST2016-06-22T23:52:01+5:302016-06-22T23:52:01+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा, सिंदखेडराजा आणि साखरखेर्डा परिसरात पावसाने प्रारंभ केला.

Heavy rain in Pimpalgaon and Sonora area | पिंपळगाव, सोनारा परिसरात दमदार पाऊस

पिंपळगाव, सोनारा परिसरात दमदार पाऊस

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : सिंदखेडराजा तालुक्यात जांभोरा, सिंदखेडराजा आणि साखरखेर्डा परिसरात दोन दिवसात पावसाने प्रारंभ केला आहे. या पावसाने जलयुक्त शिवार योजनेतील नाले दुथडी भरुन वाहल्याने त्यात पाणीसाठा झाला आहे. पिंपळगाव सोनारा या गावात तब्बल दोन वर्षांनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाचा झिंग झिंग झिंगाट पहावयास मिळाला.
१९ जून रोजी सिंदखेडराजा, जांभोरा, किनगावराजा या मंडळात दमदार पाऊस झाला. महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी पर्जन्यमापक यंत्रावरून नोंद घेतली असता, सिंदखेडराजा येथे ८३.८ मिमी, जांभोरा येथे ७४ मिमी., तर किनगावराजा येथे ३0 मिमी पावसाची नोंद झाली. २१ जून रोजी रात्री साखरखेर्डा येथे १७ मिमी पावसाची नोंद झाली. रात्रीला पिंपळगाव सोनारा, शिंदी, राताळी, मोहाडीचा काही भाग, रानअंत्री, मेरा बु. अंत्रीखेडेकर, मेरा खु. या भागात दमदार पाऊस झाल्याने नदीनाले, दुथडी भरुन वाहली. पहिल्याच दमदार पावसाने भोगावती नदीचे पात्र दुथडी भरले होते. या नदीवर सिंचन विभागाच्यावतीने बंधारा टाकण्याचे काम सुरू होते. माती भरावाच्या वरून पाणी वाहिल्याने माती भराव वाहून गेला. त्यामुळे आज दिवसभर काम बंद होते. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला तरी सवडद, गुंज, वरोडी, तांदूळवाडी, साखरखेर्डा, बाळसमुद्र, शेंदुर्जन, राजेगाव, कंडारी, भंडारी, जागदरी, दरेगाव, हनवतखेड, हिवरा गडलिंग, वाघाळा, मलकापूरपांग्रा, परिसरात दमदार पाऊस न पडल्याने या भागातील शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. ज्या-ज्या भागात पाऊस पडला त्या भागातील शेतकर्‍यांनी कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन पेरणीला सुरुवात केली आहे.

Web Title: Heavy rain in Pimpalgaon and Sonora area