मोताळा तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस
By Admin | Updated: August 28, 2014 23:53 IST2014-08-28T23:49:45+5:302014-08-28T23:53:38+5:30
मातोळा तालुक्यात पावसामुळे बळीराजा सुखावला.

मोताळा तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस
मोताळा : तालुकाभरात २७ ऑगस्टच्या रात्री सर्वदूर पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहणार्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तालुक्यात आतापर्यंत २९३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुकाभरात कमी-अधिक प्रमाणात समाधानकारक पाऊस होत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागांसह परिसरात प्रथमच नदी, नाल्यांना पाणी आल्याने नागरिकांमधून समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात ४१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात झाली आहे. पावसाअभावी पिकांसह जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पिकांना जीवदान देणारा पाऊस अधून-मधून पडत होता. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे कुठल्याच सणात शेतकर्यांना उत्साह राहिला नव्हता. सर्वत्र शुकशुकाटाचे वातावरण दिसत होते. मात्र कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे भवितव्य अंधातरी असतांना बुधवारी रात्री जवळ पास चार तास पर्जन्यराजाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे शेतकरी वर्गात आंनदाचे वातावरण दिसून येत आहे.