चार हजाराची लाच घेताना ग्रामसेवक गजाआड
By Admin | Updated: August 29, 2014 00:09 IST2014-08-29T00:08:46+5:302014-08-29T00:09:07+5:30
खामगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले.

चार हजाराची लाच घेताना ग्रामसेवक गजाआड
खामगाव : घरकुल मंजूर करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणार्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई आज २८ ऑगस्ट रोजी खामगाव येथे घडली.
मिळालेल्या माहितीवरून मांडणी ता. खामगाव येथील भगवान संपत गवई (वय ५७) यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक विलास अंभोरे यांनी पैशाची मागणी होत होती; तसेच यासाठी त्यांना त्रास देण्यात येत होता. त्यामुळे याला कंटाळून या प्रकाराबाबतची तक्रार गवई याने बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचला, त्यानुसार आज भगवान संपत गवई रा.मांडणी यांच्याकडून चार हजार रुपये लाच स्वीकारताना नांद्री मांडणीचे ग्रामसेवक विलास सटवाजी अंभोरे (वय ३५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी लाच घेणार्या ग्रामसेवक विलास अंभोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एस. एल. मुंढे यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक खंडारे व इतरांनी केली.