शौचालयाच्या प्रमाणपत्रावरून ग्रामसेवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:45 IST2017-09-22T00:45:16+5:302017-09-22T00:45:25+5:30
जानेफळ : घरातील शौचालय दाखविल्याशिवाय प्रमाणपत्र देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने ग्रामसेवकास दोघा भावांनी मारहाण केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी नायगाव देशमुख येथे घडली.

शौचालयाच्या प्रमाणपत्रावरून ग्रामसेवकाला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : घरातील शौचालय दाखविल्याशिवाय प्रमाणपत्र देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने ग्रामसेवकास दोघा भावांनी मारहाण केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी नायगाव देशमुख येथे घडली.
ग्रामसेवक पुरुषोत्तम कचरु गवई यांच्याकडे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र मागणीसाठी आलेल्या संतोष जगदेव लाड व श्रीकृष्ण जगदेव लाड दोघे रा.नायगाव यांना ग्रामसेवक पुरुषोत्तम गवई यांनी शौचालय पाहिल्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगून चला तुमच्या घरी येतो शौचालय पाहून फोटो काढून घेऊ, असे म्हणत शिपाई संतोष शालीग्राम शिंदे याला सोबत घेत संतोष लाड व श्रीकृष्ण लाड यांच्या घरी पोहोचले. दरम्यान, या दोघांनी शौचालय दाखविण्यास नकार देत शौचालय प्रमाणपत्राची मागणी केली.
त्यामुळे ग्रामसेवक गवई यांनी तसे प्रमाणपत्र देता येणार नाही, असे म्हटले असता श्रीकृष्ण लाड याने जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याबाबत ग्रामसेवक पुरुषोत्तम कचरु गवई यांच्या तक्रारीवरून कलम ३५३, ३२३, ३३२, ५0४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार टकले हे करीत आहेत.