समृद्धीवर मुंबईच्या व्यापाऱ्याकडील ४.६० कोटींचे सोने लुटले, दरोडेखोर राजस्थानमधील असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:16 IST2025-08-23T17:13:43+5:302025-08-23T17:16:44+5:30

एका आरोपीसह दोन कार जप्त

Gold worth 4.60 crores looted from Mumbai businessman on Samruddhi, robbers suspected to be from Rajasthan | समृद्धीवर मुंबईच्या व्यापाऱ्याकडील ४.६० कोटींचे सोने लुटले, दरोडेखोर राजस्थानमधील असल्याचा संशय

समृद्धीवर मुंबईच्या व्यापाऱ्याकडील ४.६० कोटींचे सोने लुटले, दरोडेखोर राजस्थानमधील असल्याचा संशय

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले. ४ कोटी ६० लाख रुपयांचा पावणे पाच किलो सोन्याचा ऐवज यात लंपास केला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह दोन कार जप्त केल्या आहेत. प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असून, ते राजस्थानमधील असल्याची माहिती मेहकर पोलिसांच्या तपासांत समोर येत आहे. दरम्यान, एका आरोपीस अटक करीत दोन कारही जप्त केल्याचे मेहकचे एसडीपीअेा प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले आहे.

मुंबईतील सराफा व्यापारी अनिल शेशमलजी चौधरी हे खामगाव येथून सोन्याचा ऐवज घेऊन एमएच- ४३- बीयू- ९५५७ या क्रमांकाच्या गाडीतून मुंबईकडे निघाले होते. फरदापूर टोलनाका पार केल्यानंतर चालकाने पोटदुखीचे कारण सांगत गाडी बाजूला उभी करण्यास सांगितले. व्यापारी गाडी चालवीत असतानाच मागून आलेल्या इनोव्हा गाडीतून चार ते पाच दरोडेखोर उतरले. त्यांनी व्यापाऱ्यावर चाकूचे वार करीत त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. याच गोंधळात व्यापाऱ्याचा चालक सोन्याने भरलेली बॅग उचलून थेट दरोडेखोरांच्या गाडीत बसल्याचे सांगण्यात येते.

पातूरच्या जंगलात गाडी टाकून पसार

मालेगाव टोलनाका ओलांडताना दरोडेखोरांनी अडथळा तोडत गाडी पुढे नेली. मात्र, पातूरच्या जंगल परिसरात पोलिस नाकाबंदीच्या भीतीने त्यांनी इनोव्हा गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी तत्काळ वेढा घालत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने उर्वरित आरोपींचा मागोवा घेतला जात आहे. दरम्यान या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लूटमारीदरम्यान जखमी झालेल्या व्यापाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

व्यापाऱ्यांमध्ये दहशत, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे व्यापारी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा दावा होत असतानाच अशा लूटमारींनी प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. महामार्गावरील पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी आता अधिक सजग होण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Gold worth 4.60 crores looted from Mumbai businessman on Samruddhi, robbers suspected to be from Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.