रसवंती चालकांना आर्थिक पॅकेज द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:36 IST2021-04-23T04:36:57+5:302021-04-23T04:36:57+5:30
रसवंतीसाठी शेतकरी दरवर्षी उसाची लागवड करत असतो. बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने नाहीत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील लागवड केलेल्या ...

रसवंती चालकांना आर्थिक पॅकेज द्या !
रसवंतीसाठी शेतकरी दरवर्षी उसाची लागवड करत असतो. बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने नाहीत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील लागवड केलेल्या उसाला रसवंतीशिवाय पर्याय नाही. गत वर्षी लॉकडाऊनमुळे चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील लागवड केलेला ऊस तसाच वाळून गेला. यावर्षी सुद्धा संचारबंदी केल्याने रसवंती चालकांचा व्यवसाय ठप्प पडल्याने प्रामुख्याने रसवंतीसाठी लागवड केलेला ऊस तसाच पडून राहणार आहे. शिवाय सद्य:स्थितीत जिल्ह्यातील शेतकरी स्वत:च्या रसवंतीसाठीच उसाची लागवड करतात, त्यामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. बहुतांश रसवंती गावाबाहेर आहेत. गावात किंवा शहरात असणाऱ्या दुकानात फार मोठी गर्दी होते, असे कुठेही चित्र कोणत्याही रसवंतीमध्ये कधी पाहायला मिळाले नाही. रसवंती चालकांनी प्रत्येक ग्राहकांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. राज्य महामार्ग किंवा इतर रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने ही तर प्रवाशांच्याच भरवशावर चालतात. त्यामुळे संचारबंदी किंवा लॉकडाऊन काळात रसवंती चालक यांना रसवंती सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी व रसवंती चालक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे. ग्राहकांअभावी पडून असलेला ऊस साखर कारखान्याला देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी केली आहे. त्यानुषंगाने चिखली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व रसवंती चालक शेतकऱ्यांनी देखील आ. श्वेता महाले यांची भेट घेऊन त्यांना रसवंतीसाठी परवानगी, आर्थिक पॅकेज व ग्राहकांअभावी पडून राहणाऱ्या उसाची व्यवस्था लावण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी अॅड. सुनील देशमुख, अॅड. दिलीप यंगड, विकास जाधव, आदींसह रसवंती चालक उपस्थित होते.