विधवा महिलांना शासकीय याेजनांचा लाभ द्या-जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:56+5:302021-09-24T04:40:56+5:30

बुलडाणा : कोविडमुळे लहान मुले जशी अनाथ किंवा एक पालक झाली, तशाच पद्धतीने अनेक विवाहित महिलांचे पती मृत्यू पावल्यामुळे ...

Give benefits of government schemes to widows-Collector | विधवा महिलांना शासकीय याेजनांचा लाभ द्या-जिल्हाधिकारी

विधवा महिलांना शासकीय याेजनांचा लाभ द्या-जिल्हाधिकारी

बुलडाणा : कोविडमुळे लहान मुले जशी अनाथ किंवा एक पालक झाली, तशाच पद्धतीने अनेक विवाहित महिलांचे पती मृत्यू पावल्यामुळे महिलाही विधवा झाल्या आहेत. अशा महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने मिशन वात्सल्य उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोविडमुळे पतीचा मृत्यू होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एस़ रामामूर्ती यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या बालक व पतीच्या मृत्यूमुळे विधवा महिलांच्याप्रकरणी जिल्हा कृती दलाची आढावा बैठक २३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, महिला व बालविकास अधिकारी मारवाडी, बाल संरक्षण अधिकारी मराठे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोविडमुळे एक पालक अथवा अनाथ झालेल्या बालकांची शैक्षणिक कागदपत्रे त्वरित देण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, शिक्षण विभागाने संबंधित एक पालक अथवा अनाथ मुलांची शैक्षणिक कागदपत्रे संबंधित शाळांकडून घेऊन बाल कल्याण समितीला द्यावी. जेणेकरून अशा बालकांना शैक्षणिक मदत करता येणे शक्य होईल. त्यांचे शैक्षणिक शुल्क, भविष्यातील शिक्षणाच्या सुविधा यासाठी तजवीज करता येईल. चाईल्ड लाईनने १०९८या टोल फ्री क्रमांकाला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय, उपकेंद्र, सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्थळे, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर प्रसिद्धी द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले

अनाथ झालेल्या बालकांना पाच लाखांची मदत

आईवडील गेल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सर्वांचे बँक खाते काढण्यात आले आहे. या खात्यामध्ये शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. तरी संबंधित विभागाने या अनाथ बालकांची सर्व कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी. प्रलंबित ठेवू नये. विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व महिलांची प्रकरणे तयार करावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले़

काेविडमुळे १४ बालके झाली अनाथ

जिल्ह्यात काेविडमुळे १४ बालके अनाथ झाली आहे़ यामध्ये ४ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे़ तसेच एक पालक गेलेल्या बालकांची संख्या ३७६ असून यामध्ये २०५ मुले आणि १७१ मुलींचा समावेश आहे़ बाल कल्याण समितीमार्फत गृह चौकशी आदेश ३०६ प्रकरणात देण्यात आले आहेत़ बाल कल्याण समितीमार्फत एक पालक असलेल्या आणि ताबा घेतलेल्या बालकांची संख्या २९३ आहे़

Web Title: Give benefits of government schemes to widows-Collector