आरक्षणासाठी मोर्चा
By Admin | Updated: August 13, 2014 00:31 IST2014-08-13T00:31:53+5:302014-08-13T00:31:53+5:30
गोरबंजारा समाज आक्रमक

आरक्षणासाठी मोर्चा
बुलडाणा : देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्ष झाल्यानंतरही गोरबंजारा समाज आपल्या न्याय हक्क व विकासापासून वंचित आहे. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसह गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हजारो समाज बांधवांचा मोर्चा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज १२ ऑगस्ट रोजी धडकला. या मोर्चासाठी जिल्ह्यातील गोरबंजारा बांधव मोठय़ा संख्येने विविध वाहनांद्वारे येथील प्रशासकीय इमारत परिसरात एकत्र आले होते. त्यानंतर मोर्चा विविध घोषणांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाला गोरबंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात दाखल प्रस्तावाची अंमलबजावणी करावी, अनुसूचित जमाती प्रवर्गाचे निकष पूर्ण करीत असताना समाजाची शक्ती हीन करण्यासाठी बंजारा समाजाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सूचित समाविष्ठ केले आहे. आता त्यांना या प्रवर्गातून काढण्याचे षड्यंत्र सुरू आहे, ते थांबवावे. महाराष्ट्रात समाजाची अनुसूचित जमातीत नोंद केली नाही, त्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या सोयी-सवलती, प्रगतीपासून वंचित रहावे लागते. महाराष्ट्र शासनाने आजही सूची जाहीर केली नाही. इतर समस्या त्वरित सोडविण्याची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली. या मोर्चाला विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष निलेश राठोड यांनी पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चात गोरबंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष प्रवीण आडे, ग्रामसेवक संघटनेचे आर.व्ही.चव्हाण, निलेश राठोड, रितेश पवार, विनोद चव्हाण, अनिल राठोड, प्रा रमेश राठोड, सुभाष आडे, वितेश चव्हाण प्रल्हाद राठोड, गणेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
** बंजारा समाजाने दाखवले संघटन
या मोर्चासाठी आज सकाळपासूनच टेम्पो, काळी पिवळी, खाजगी वाहन, टॅक्सी, एसटी बस आदीने हजारो भाविक प्रशासकीय इमारतीसमोर एकत्रित आले. यावेळी मोर्चासाठी मोताळा तालुका, मलकापूर, दे.राजा, सिं.राजा, चिखली, खामगाव, नांदुरा, शेगाव, मेहकर, संग्रामपूर आदी दूरवरच्या तालुक्यातून मंडळी एकत्रित आली होती.
** मोर्चात सहभागी झालेल्या बंजारा समाजातील महिलांनी नृ.त्य करत डफडेदेखील वाजविले. अधिकतर महिला या बंजारा समाजाच्या पेहराव्यात उपस्थित झाल्या होत्या. त्यामुळे महिलांची वेशभूषा, डफडे वाजविण्याची कला, नृ.त्य आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विशेष म्हणजे मोर्चातील समाजबांधवांची उपस्थितीची चर्चा आज दिवसभर शहरात होती.