बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय किसान संघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:16 IST2018-05-28T16:16:06+5:302018-05-28T16:16:06+5:30
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ जिल्हा शाखेच्या वतीने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक ते पाच वाजेदरम्यान एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय किसान संघाचे धरणे
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ जिल्हा शाखेच्या वतीने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक ते पाच वाजेदरम्यान एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सदोष निर्णय पद्धती व प्रशासनाचा संवेदनहीन कारभार यामुळे समस्या वाढत आहेत. मागच्या सरकारने केलेल्या चुकांचे निरसन करण्याचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी नवीन सरकारकडे मोठ्या आशेने पाहिले. परंतू शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. चुकीच्या आयात धोरणांनी शेतमालाच्या किंमती घटल्या व शेतकरी देशोधडीला लागला. स्वयंघोषित हमी भावाने शेतीमाल खरेदी करता आला नाही. व्यापाऱ्यांनी याचा लाभ घेऊन नफेखोरी केली. सरकारला मात्र यावर नियंत्रण ठेवला आले नाही. या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाने अनेकवेळा आंदोलने केली. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर योजना लागू करावी, दिवसाला १२ तास पूर्ण दाबाची विज मिळावी, वन्यप्राण्यांची वनातच पाणी, अन्न व सुरक्षेची व्यवस्था करुन शेतमालाचे रक्षण करावे, प्रतिबंधित व अप्रमाणित बियाणे विकणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शेत तिथे रस्ता अभियान राबवावे, सर्व शेतमालावर व्यक्तीगत विम्याला परवानगी देऊन कंपन्याकडून न दिलेली रक्कम देण्यास भाग पाडावे, कृषी मालाची आयात बंद करावी, तूर व हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळावी, कापूस उत्पादक शेतकऱ्यां ना बोंड अळी नियंत्रणासाठी काम गंध सापळे मोफत देण्यात यावे या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, उपाध्यक्ष नंदकूमार खडके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नारायण पाटील सुसर, मुकुंदराव भिसे, शंकरलाल भुतडा, कैलास ढोले, दगडू गाडेकर, अर्जूनराव गारोळे आदींची उपस्थिती होती.