पाच दिवसानंतर उघडली शाळा शाळेला
By Admin | Updated: July 3, 2014 22:57 IST2014-07-03T21:19:18+5:302014-07-03T22:57:37+5:30
पहिल्याच दिवशी ठोकले होते कुलूप

पाच दिवसानंतर उघडली शाळा शाळेला
शेलगाव देशमुख : मेहकर तालुक्यातील विश्वी येथील जि.प.मराठी पूर्व शाळेला २६ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रलंबीत मागण्यांसाठी कुलूप ठोकण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शाळेचे कुलूप तोडले, त्यामुळे तब्बल पाच दिवसानंतर शाळा खुली झाली.
प्राप्त माहितीनुसार, विश्वी येथील जि.प.मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या जमीन हर्रासीची रक्कम जि.प.मध्ये जमा होऊन शाळेच्या विकासासाठी परत मिळत होती. परंतु २00५ पासून जि.प.कडे ३ लाख ६३ हजार १0७ रुपये पडून असल्याने सदर रकमेचा उपयोग शाळेच्या विकासासाठी करण्यात यावा, म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन हर्रासी मोबदला परत देण्यात यावा, अशी १२ जून रोजी मागणी केली होती. सदर रक्कम परत न मिळाल्यास शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करण्याचा इशारा दिला होता. परंतु संबंधित अधिकार्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने २६ जून रोजी चिमुकल्यांना शाळेत जाता आले नाही. तर चक्क सतत पाच दिवस शाळा ग्रामपंचायतच्या व्हरांड्यामध्ये व सार्वजनिक वाचनालयामध्ये भरविण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांंना शाळेच्या पहिल्याच दिवसाचा आनंद लुटता आला नाही. तसेच घाईघाईत नवागतांचे स्वागत आटोपून शिक्षकांना आपले विद्यार्थी ग्रामपंचायतमध्ये बसवावे लागले. पाच दिवसाच्या कालावधीमध्ये मेहकर तालुका गटशिक्षण अधिकारी अथवा इतर अधिकारी यांनी मुख्याध्यापकांनी माहिती देऊनही साधी भेट सुद्धा दिली नाही. शिक्षण प्रक्रियेत नवनवे प्रयोग करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे कार्य करणारे गटशिक्षण अधिकारी किशोर पागोरे यांनी शाळेला भेटही दिली नाही, असे दिसून येते. मात्र शेवटी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांंनी गेटचे कुलूप तोडत असल्याचे निवेदन १ जुलै रोजी प्रशासनाकडे दिले. त्यानंतर भरिप बहुजन महासंघाचे तालुका उपाध्यक्ष रामराव राठोड यांच्या नेतृत्वात सदर शाळा विद्यार्थ्यांंसाठी खुली करण्यात आली. यावेळी त्र्यंबक खंडारे, मुलचंद जाधव, पंजाब सिरसाट, सुरेश जाधव, रामदास मांजरे, संतोष आडे, मानिक राठोड, शेषराव आडे, गणेश जाधव, जितेश जाधव, उमेश चव्हाण, राजू जाधव, मदन अंभोरे, सुनिल राठोड, विष्णू जाधव, शाम वाघमारे, निलेश राठोड, रामराव जाधव व सुभाष जाधव यांचेसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी ५ दिवसापासून आपल्या शाळेपासून वंचित असलेल्या निरागस चिमुकल्यांना आपली शाळा मुक्त झाल्याचा आनंद दाटून आला. मुख्याध्यापक पी.एन.गाढे यांनी गावकर्यांचे आभार मानले.