लाडणापूर येथे आगीत दोन घरे भस्मसात
By Admin | Updated: May 26, 2017 01:29 IST2017-05-26T01:29:17+5:302017-05-26T01:29:17+5:30
संग्रामपूर : तालुक्यातील लाडणापूर येथे २४ मेच्या मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान नवीन प्लॉटमधील असलेल्या दोन घरांना अचानक आग लागली.

लाडणापूर येथे आगीत दोन घरे भस्मसात
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यातील लाडणापूर येथे २४ मेच्या मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान नवीन प्लॉटमधील असलेल्या दोन घरांना अचानक आग लागली. या आगीत दोन्ही घरे भस्मसात झाली असून, घरातील जीवनावश्यक सर्वच वस्तु, धान्य असे एकूण २ लाख ९४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, दोन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत.
लाडणापूर येथे जगदंबा देवी मंदिराच्या मागील बाजूस नवीन वस्तीमधील प्लॉटमध्ये विश्वनाथ वामन धांडे व एकनाथ जंगलुमन अवचार यांची घरे आहेत. दरम्यान, एकनाथ जंगलुमन अवचार यांच्या घराच्या मागील बाजुस अचानक मध्यरात्री आग लागली. आग मोठ्या प्रमाणात लागलेली असल्यामुळे काही क्षणातच अवचार यांचे घर या आगीत भस्मसात झाले. दरम्यान, अवचार कुटुंब हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घराबाहेर झोपलेले होते. त्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. तर ही आग पसरुन शेजारी राहणारे विश्वनाथ वामन धांडे यांच्या घरानेसुद्धा पेट घेतला. या आगीमध्ये विश्वनाथ धांडे यांचे घरातील साहित्य खाक झाले. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन्ही कुटुंबीयांनी मदतीसाठी हाक दिली असता, गावातील सर्वच मंडळी आग विजवण्यासाठी आली होती; मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे दोन्ही घरे भस्मसात झाली.