कमी कर्मचार्यांचा ग्राहकांना फटका
By Admin | Updated: August 4, 2014 23:20 IST2014-08-04T23:18:55+5:302014-08-04T23:20:56+5:30
स्टेट बॅकसमोर दिवसभर रांगा : वृद्धांनाही बसावे लागते ताटकळत

कमी कर्मचार्यांचा ग्राहकांना फटका
मेहकर : स्थानिक भारतीय स्टेट बँकेत कर्मचार्यांची संख्या कमी असल्यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. त्यामुळे अनेकांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे महिलांसह वृद्धांनां त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कर्मचार्यांचे वेतन असो की, सर्वसामान्यांचे व्यवहार ; सर्व व्यवहार भारतीय स्टेट बँकेत होतात.आता शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तसेच शासनाच्यावतीने निराधार व वृद्धांना मिळणारा आर्थिक लाभही दिला जातो. यासह शेतकर्यांचे पीक कर्ज काढणे, पीक विमा भरणे आदी व्यवहारही भारतीय स्टेट बँकेतूनच करण्यात येतात. अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटक भारतीय स्टेट बँकेशी जोडला गेलेला आहे. तसेच दिवसेंदिवस भारतीय स्टेट बँकेत ग्राहकांची संख्या वाढत आहे. परंतू, वाढत्या ग्राहक संख्येच्यातुलनेत बँकेतील सुविधा मात्र नियोजन शुन्य दिसून येत आहेत. बँकेत कर्मचारी व काऊंटरचा अभाव असल्याने पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी होत आहे. येथे वृद्ध, महिला यांच्यासाठी स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था नसल्याने त्यांनाही ताटकळत बसावे लागत आहे. तर बँकेत वेळीच कामे होत नसल्याची ओरडही ग्राहकांमधुन वारंवार होत आहे. पीक विमा काढण्यासाठी शेतकर्यांची स्टेट बँकेत गर्दी होत आहे. येथील एटीएम मशीनही कित्येक दिवसांपासून बंद असल्याने पैसे काढण्यासाठी प्रत्येकाला बँक गाठावी लागत आहे. त्यामुळे बँकेतील गर्दी अधिकच वाढत असून, त्यासाठी काऊंटर वाढविणे गरजेचे झाले आहे.