farming dispute: Big brother sentence five-year jail | वडिलोपार्जित शेतीचा वाद: थोरल्या भावास पाच वर्षांची शिक्षा

वडिलोपार्जित शेतीचा वाद: थोरल्या भावास पाच वर्षांची शिक्षा

अमडापूर : शेतीच्या वादातून भावांमध्ये वाद नवे नाहीत. अमडापूर पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या करवंड येथील सख्खा भाऊ पक्का वैरा ठरला. धाकट्या भावाला जबर मारहाण केल्याप्रकरणी त्यास ५ वर्षांची शिक्षा व ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी हा निकाल दिला. अमडापूर पोलिस स्टेशनअंतर्गत करवंड येथील अजित उर्फ भैय्यासाहेब गणपतराव जाधव व प्रदिप जाधव हे दोन सख्खे भाऊ आहेत. अनेक वर्षापासून त्यांच्यामध्ये वडीलोपार्जित शेती व जागेचा वाद सुरू आहे. काही दिवसांपुर्वी याच वादातून मोठा भाऊ भैय्यासाहेब जाधव याने लहान भाऊ प्रदिप जाधव यास मारहाण करण्यासाठी कुºहाड उगारली होती. परंतु मोठा भाऊ असल्याने लहान भावाने पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. दरम्यान १२ मे २०१८ रोजी प्रदिप हा गावातील राम मंदिरासमोर बसलेला होता. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भैय्यासाहेब जाधव तिथे आला. त्याने धाकट्या भावास चापट बुक्क्यांनी मारहाण केली.  खिशातून चाकू काढून त्याच्या पोटावर, पाठीवर व हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत धाकट्या  भावास उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातात भरती केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला औरंगाबाद हलविण्याचा सल्ला दिला. तेथे खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. प्रकरणी पोलिस कर्मचारी शाकीर पटेल यांच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी आरोपी अजित उर्फ भैय्यासाहेब जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. तपासाअंती प्रकरण येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने एकुण बारा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुण येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम.के. महाजन यांनी आरोपी भैय्यासाहेब जाधव यास पाच वर्षांची शिक्षा व ३० हजार रुपए दंडाची शिक्षा सुनावली. दंड भरला नाही तर एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतून २५ हजार रुपये धाकटा भाऊ प्रदिप जाधव यांना देण्याचे आदेश दिले आहेत. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. वसंत भटकर यांनी काम पाहिले. तर पैरवीसाठी पोलीस कॉन्स्टेबल शांंता मगर यांनी सहकार्य केले.

Web Title: farming dispute: Big brother sentence five-year jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.