जमीन खरडून गेलेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: June 28, 2014 01:42 IST2014-06-28T01:24:02+5:302014-06-28T01:42:41+5:30
लोणार तालुक्यातील ७१२ हेक्टर वरील क्षेत्र खरडले; कास्तकार अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत.

जमीन खरडून गेलेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
लोणार : गतवर्षी झालेल्या ४२0 मीमी पावसामुळे तालुक्यातील ३ हजार १२ शेतकर्यांचे ७१२ हेक्टर वरील क्षेत्र खरडून गेल्याने शेतकर्याच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अतवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेले शेतकरी वर्ष झाले तरी अद्यापपर्यंत मदतीच्या प्रतिक्षेत असून खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला तात्काळ उपलब्ध करुन देण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर चिभडे यांनी केली आहे.
गतवर्षी २३ जुलै २0१३ रोजी तालुक्यात एका दिवसात ४२0 मीमी १७ इंच एवढा पाऊस पडल्याने तालुक्यातील आठही जलाशये १00 टक्के भरली होती.
नद्या नाल्यांना पूर आल्याने नदी नाल्याकाठच्या शेताचे मोठे नुकसान झाले होते. ४२0 मीमी पावसामुळे तालुक्यातील टिटवी, गोत्रा, नांद्रा, रायगाव, धाड, गायखेड, देऊळगाव कुंडपाळ, येवती, वझर आघाव, चिंचोली सांगळे, वडगाव तेजन, शारा आदी ठिकाणच्या ३ हजार १२ शेतकर्यांची ७१२ हेक्टर शेत जमीन खरडून गेलेली आहे.
यामध्ये खरडून गेलेल्या परंतु दुरुस्त होणार्या ६६१ हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टरी १५ हजार रुपये तर दुरुस्त न होणार्या ५२ हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात येणार होती. मात्र वर्ष झाले तरी अद्यापपर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडला आहे.
अतवृष्टीनंतर झालेली गारपीट आणि आता पुन्हा पेरणीच्या काळात पावसाने मारलेली दडी यामुळे बळीराजावर अस्मानी सोबत सुलतानी संकट ओढावले आहे.
खरडून गेलेल्या क्षेत्राचा सर्वे होऊन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवूनही शेतकरी वर्षभरापासून मदतीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शेतकर्यांना तात्काळ मदतीचे वाटप करण्याची मागणी पं.स.सदस्य ज्ञानेश्वर चिभडे यांनी केली आहे.
तालुका कृषी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नुकसान भरपाईची खात्री दिली. अतवृष्टीमुळे खरडून गेलेल्या ७१२ हेक्टर क्षेत्रापैकी ६६0 हेक्टर दुरुस्त होणारे असून यासाठी १५ हजार रुपये तर दुरुस्त न होणारे ५२ हेक्टर साठी २५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसानीचा संपूर्ण अहवाल सर्वेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला असून शासन स्तरावरुन निधी प्राप्त होताच शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.