शेतकऱ्यांनी पेरणी थांबवून केले परंपरेचे जतन, वर्जिकवार असल्याने मंगळवारी पेरणी थांबवली
By विवेक चांदुरकर | Updated: June 20, 2024 16:36 IST2024-06-20T16:36:06+5:302024-06-20T16:36:47+5:30
परिसरात गेल्या १७ जून रोजी सोमवारी रात्री दमदार पाऊस पडला. त्यापूर्वीही दोन ते तीन वेळा जोरदार पाऊस झाला. जमिनीमध्ये ओलही चांगली आहे.

शेतकऱ्यांनी पेरणी थांबवून केले परंपरेचे जतन, वर्जिकवार असल्याने मंगळवारी पेरणी थांबवली
घारोड (कैलास नांदोकार) : पेरणीसाठी चांगले वातावरण असल्यावरही मंगळवारी जमिनीसाठी वर्जिकवार असल्याने घारोड व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही.
परिसरात गेल्या १७ जून रोजी सोमवारी रात्री दमदार पाऊस पडला. त्यापूर्वीही दोन ते तीन वेळा जोरदार पाऊस झाला. जमिनीमध्ये ओलही चांगली आहे. पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पूर्ण तयारी सुध्दा केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी मंगळवार असल्याने या दिवशी जमिनीला वर्जिकवार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. वर्जिकवारांच्या दिवशी शुभ काम करण्यात येत नाही. त्याप्रमाणे शेतकरी सुध्दा जमिनीला असलेल्या वर्जिकवारला बियाणे जमिनीत टाकत नाहीत. मंगळवारी घारोड, निरोड, अकोली, लोखंडा, नायदेवी, उमरा, अटाळी परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी योग्य वातावरण असताना सुद्धा पेरणी केली नाही. १९ जून रोजी बुधवारी सर्वांनी पेरणीला सुरुवात केली. या परिसरात बुधवारी ९० टक्के पेरणी आटोपली.
एकाच दिवशी पेरणी, मजुरांची टंचाई
गावामध्ये एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. त्यामुळे मजुरांची चांगलीच टंचाई जाणवली. शेतकरी जास्त पैसे देऊनही मजूर मिळाले नाही. मजुरांनीही मजुरी वाढवली. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आपल्या मुलाबाळांनाही कामाला लावले.
शेतकऱ्यांची लक्ष्मी जमीन आहे. मंगळवार जमिनीला असलेला वर्जिकवार आहे. त्यामुळे या दिवशी कितीही पोषक वातावरण असले तरी या दिवशी आम्ही परंपरेने या दिवशी पेरणी करीत नाही, असं शेतकरी नितीन थेटे म्हणाले.