आमदारांच्या घरावर शेतकरी दिंडीची धडक!
By Admin | Updated: June 7, 2017 19:08 IST2017-06-07T19:08:55+5:302017-06-07T19:08:55+5:30
जळगाव जामोद : शेतकरी महिलांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

आमदारांच्या घरावर शेतकरी दिंडीची धडक!
जयदेव वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : शेतकऱ्यांच्या संपाच्या सातव्या दिवशी ७ जून रोजी संपूर्ण कर्जमुक्ती तथा स्वामीनाथन आयोग लागू करा, निर्यात बंदी उठवावी इत्यादी महत्वपूर्ण मागण्यांसाठी या विभागाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या घरावर शेतकऱ्यांनी दिंडी काढली.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासह विविध घोषणा देत जळगाव, संग्रामपूर तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बुधवारी दुपारी १२ वाजता शहरातील मुख्य चौकामधून दिंडी काढली व सदर दिंडी आमदार संजय कुटे यांच्या घरासमोर नेली. या दिंडीला भाराकाँ, राकाँ, भारिप-बमसं, भाकप, माकप या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रीय पाठिंबा होता. आमदार कुटे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख दिनकर दाभाडे, जिल्हाध्यक्ष रमेश बाणाईत, तालुकाध्यक्ष अनंता बकाल, रामेश्वर काळे, ज्ञानदेव तायडे, सौ.ज्योतीताई ढोकणे, डॉ.स्वातीताई वाकेकर, राजेंद्र भोंगळ यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी आ.कुटे यांच्या प्रतिनिधीने दिंडीचे निवेदन स्विकारले. या शेतकरी दिंडीमध्ये प्रसेनजित पाटील, रंगराव देशमुख, गजानन देशमुख, युनूसखान, प्रविण भोपळे, अजयसिंह राजपूत, अविनाश उमरकर, बालगजानन अवचार, संदीप उगले, राजेंद्र देशमुख, बंडू पाटील, बाळू डिवरे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. तर महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.
सहा शेतकऱ्यांना श्रध्दांजली
यावेळी मध्यप्रदेशातील शासनाने केलेल्या अमानुष गोळीबारात शहीद झालेल्या सहा शेतकऱ्यांना सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. नारायण शिंदे यांनी शेतकऱ्यांवर गौरव गीत गायीले. त्यानंतर राष्ट्रगीताने दिंडीची सांगता झाली.