विमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:42+5:302021-09-12T04:39:42+5:30
राहेरी बु : परिसरात गत काही दिवसांपासून झालेल्या जाेरदार पावसामुळे खरिपाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ पिकाचे नुकसान ...

विमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत
राहेरी बु : परिसरात गत काही दिवसांपासून झालेल्या जाेरदार पावसामुळे खरिपाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी लागते; मात्र राहेरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे़ कंपनीने दिलेले ॲप चालत नाही तर हेल्पलाईनसाठी दिलेला फाेन लागत नाही़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे़
राहेरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा याेजनेत सहभाग घेतला आहे़ गत काही दिवसांपासून राहेरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मिरची, तूर आणि उडीद पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ सततच्या पावसामुळे साेयाबीनच्या शेंगा भरण्यापूर्वीच पिवळी पडत आहेत़ काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे़ पीक विमा काढला असूनही तक्रार करता येत नसल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़
हेल्पलाईन क्रमांक बंद
पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक दिला आहे; मात्र हा क्रमांक बंद असल्याने शेतकऱ्यांना संवाद साधता येत नाही़ तसेच क्रॉप इन्शुरन्स ॲप्ससुद्धा बरोबर चालत नाही.अशा वेळेस नुकसान झालेल्यांनी कुठे तक्रार करायची असा प्रश्न सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे़
यावर्षी मुसळधार पावसामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी कंपनीला माहिती देण्याचा प्रयत्न केला असता हेल्पलाईन क्रमांक बंद आहे़ तसेच ॲपही व्यवस्थित चालत नाही़ त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
सुभाषराव देशमुख राहेरी बु., उपसरपंच
माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांनी साेयाबीन, कपाशी व इतर पिकाचा विमा काढलेला आहे़ सध्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे़ याविषयी हेल्पलाईन क्रमांकावर माहिती देण्याचा प्रयत्न केला असता ताे क्रमांकच बंद आहे़ ॲपही व्यवस्थित नसल्याने नुकसानीची माहिती कशी द्यावी,असा प्रश्न पडला आहे़
मधुकर मगर, सीएसी केंद्र संचालक
ज्या शेतकऱ्याचे पुराच्या पाण्यामुळे किंवा शेतात पाणी थांबल्यामुळे पीक नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी हेल्पलाइन नंबर लागत नसेल तर किंवा ॲप्स बरोबर चालत नसेल तर तालुकास्तरावर कार्यालय सुरू झालेले आहे़ तिथे शेतकऱ्यांनी लेखी अर्ज द्यावेत़
वसंतराव राठोड, कृषी अधिकारी सिंदखेडराजा