नेत्रदानात महिलांचा टक्का वाढला!
By Admin | Updated: June 8, 2017 02:31 IST2017-06-08T02:31:18+5:302017-06-08T02:31:18+5:30
१५० महिलांचा सहभाग : ६५० नागरिकांनी केला नेत्रदानाचा संकल्प

नेत्रदानात महिलांचा टक्का वाढला!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नेत्रदानाचे महत्त्व जाणून जिल्ह्यातील गत वर्षभरात ६५० नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला. यापैकी १५० महिलांनी आपल्या मृत्यूनंतर हे सुंदर जग दुसऱ्या कुणाला स्वत:च्या डोळ्यांनी पाहता यावे, याकरिता नेत्रदान करण्याचा संकल्प करून सामाजिक दायित्व जोपासले आहे.
नेत्रदानासाठी सर्वत्र मोहीम राबविली जात असताना, अनेक सामाजिक संस्थासुद्धा शिबिरांच्या माध्यमातून याविषयी प्रबोधन करताना आढळून येतात. जिल्हात विविध रुग्णालयात गत वर्षभरात जवळपास ६५० स्त्री-पुरुषांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. यामध्ये १५० स्त्रिया आणि ५०० पुरुषांनी आपली नावे नोंदविली. इतर अवयव दान करण्याबरोबरच नेत्रदानामुळे आपले डोळे आपल्या मृत्युनंतर गरजू व्यक्तीच्या कामी येईल. या भावनेतून नेत्रदानाचा संकल्प केल्यानंतर जिल्ह्यातील लोकांमध्ये जनजागृती होताना दिसत आहे.
मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी १८ ते ४० वयोगटातील कोणतीही व्यक्ती संकल्पपत्र भरून आपली इच्छा पूर्ण करू शकतो, अशी व्यक्ती अपघातात किंवा नैसर्गिकरीत्या मरण पावली असता, त्या व्यक्तीचे डोळे सहा तासांच्या आत काढल्यास त्याचा उपयोग दृष्टीहीन व्यक्तीला होतो. डोळ्यांचे रोपण करण्याआधी त्याच्या आजाराची योग्य ती तपासणी करण्यात येऊन डोळ्यांची अवस्था निरोगी आढळून आली, तरच ते रोपण केल्या जातात.
ग्रामीण भागात नेत्रदानाविषयी जागृती आवश्यक
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही नेत्रदात्याचे प्रमाण कमी आहे. याचे कारण म्हणजे ग्रामीण जनतेमध्ये असलेली अंधश्रद्धा व नेत्रदानाविषयी असलेले अज्ञान, पुनर्जन्मावर असलेला ठाम विश्वास, यामुळे ते लोक नेत्रदान करण्यास धजावत नाहीत. मात्र, सुशिक्षित पिढी यातून बाहेर निघताना दिसत आहे. आज तरुण पिढीने ‘नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान’ असे नेत्रदानाचे महत्त्व ओळखले आहे. तरीही नेत्रदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.