संशयित दहशतवादी जुनेदच्या कबुली जबाबामुळे खामगावात खळबळ!
By अनिल गवई | Updated: August 24, 2022 14:36 IST2022-08-24T14:19:47+5:302022-08-24T14:36:28+5:30
एटीएस पथकाने दोन दिवसांपूर्वीच गोंधनापूर येथे भेट दिल्याने, याप्रकरणातील गूढ वाढत असल्याची चर्चा आहे.

संशयित दहशतवादी जुनेदच्या कबुली जबाबामुळे खामगावात खळबळ!
खामगाव : पुण्यातील दापोडी येथून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी मो. जुनेद हा मूळ खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील आहे. त्याने दहशतवादी कटात सहभागी असल्याची धक्कादायक कबुली दिल्याने खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याचवेळी जुनेदच्या संपर्कातील काहींचा शोध दहशतवाद विरोधी पथकाने चालविल्याची माहिती समोर येत आहे.
एटीएस पथकाने दोन दिवसांपूर्वीच गोंधनापूर येथे भेट दिल्याने, याप्रकरणातील गूढ वाढत असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र दहशत वाद विरोधी पथकाने पुण्यातील दापोडी येथून २४ मे रोजी मो. जुनेद या संशयीत दहशतवाद्यास अटक केली होती. त्यावेळी काश्मीरमधील दहशतवादी संघटना या घातपात आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी जुनैदला पैसा पुरवत असल्याची माहिती समोर आली होती.
जुनैद हा वेगवेगळ्या बनावट सोशल मीडिया प्रोफाईल्स तयार करुन आपल्या दहशतवादी सहकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसकडून दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार जुनेदने अनेक गंभीर गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर येत आहे.
ईदसाठी आला होता गावात...
मो. जुनेद याचे कुटुंबिय खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथे वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वीच मो. जुनेद हा गोंधनापूर येथे ईदसाठी येऊन गेला होता. त्यामुळे तो संपर्कात असलेल्यांचा आता शोध घेतल्या जात आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पथकाकडून गोंधनापूर येथे तपास करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
प्राथमिक शिक्षण गोंधनापूरात
संशयित दहशतवादी मो. जुनेद याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत झाले. सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने खामगाव येथे घेतले. त्यानंतर तो बहिणीकडे पुण्यात वास्तव्यास आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात...
जम्मू-काश्मिरातील दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या नेत्यांच्या मोहमद जुनेद हा संपर्कात होता. तो वेगवेगळ्या बनावट सोशल मीडिया प्रोफाईल्स तयार करुन आपल्या दहशतवादी सहकाºयांच्या संपर्कात असल्याचंही तपासात समोर आलं आहे.