अर्धा पावसाळा उलटला तरीही धरणे तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:52+5:302021-08-20T04:39:52+5:30
धाड : मागील दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार बरसणाऱ्या पावसाची बुलडाणा तालुक्यावर अजूनही अवकृपा असल्याने तालुक्यातील नदी, नाले आणि धरणे ...

अर्धा पावसाळा उलटला तरीही धरणे तहानलेलीच
धाड : मागील दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार बरसणाऱ्या पावसाची बुलडाणा तालुक्यावर अजूनही अवकृपा असल्याने तालुक्यातील नदी, नाले आणि धरणे अद्यापही तहानलेल्या अवस्थेत आहेत. राज्यात मुसळधार होणाऱ्या पावसाची धाड शिवारात अत्यंत जेमतेमच उपस्थिती लावली आहे.
खरिपाच्या पिकांना आवश्यक असणारा पाऊस रिमझिम स्वरूपात मिळत असल्याने त्यांना जीवदान मिळत असले तरीही अगदी थोडक्या प्रमाणात होणारा पाऊस पिकांवरील विविध किडींच्या प्रादुर्भावाकरिता पोषक ठरत आहे. सोबत सातत्याने रिमझिम पावसाने घाणीचे साम्राज्य वाढीस लागून गावागावातून साथ आजाराचे प्रस्थ वाढले आहे. विशेषतः लहान मुलांच्या आजारी रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खरीप पिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन यंदा उत्पादन क्षमता वाढण्याची लक्षणे दिसून येत असली तरी आगामी काळात रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक पाणी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या साधारण दोन महिन्यांत तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे उर्वरित दोन महिन्यांत पाऊस सक्रिय स्थितीत राहून तो भरमसाट प्रमाणात होईल का? याची शाश्वती दिसत नसल्यामुळे शेतीसह संबंधित घटक हवालदिल आहे. तालुक्यातील धाड भागात असलेल्या करडी, मासरुळ, शेकापूर, बोदेगाव, ढालसावंगी या पाचही प्रकल्पात सध्या जेमतेमच पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. जर पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात भीषण पाणी टंचाईचा सामना सबंध तालुक्याला करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.
मागील वर्षी या वेळेला सर्वत्र धरणे ओसंडून वाहत होती, तर प्रमाणाबाहेर पाऊस झाल्याने शेतीचे बहुतांश नुकसान याठिकाणी झाले होते. यंदाच्या वर्षी अर्धा पावसाळा उलटला तरीही मुबलक प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामाची शाश्वती सध्यातरी देता येत नाही. तसेच भागातील धरणांवर आधारित अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अगदी सुरुवातीपासूनच रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे यावर्षी खरिपाच्या पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढते राहिले आहे. तथा गवतवर्गीय तणांची वाढ भरमसाट झाल्याने या घटकांचे नियंत्रण करताना शेतकऱ्यांना रासायनिक औषधी यांचा वापर जास्त प्रमाणात करून, खरिपाच्या पिकांना वाचण्यासाठी अधिक खर्च करावा लागला आहे. यावर्षी नेहमीपेक्षा जास्तीचा खर्च हा तणांच्या नियंत्रणासाठी आणि पिकांवरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी करावा लागत आहे. यामुळे यावर्षी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे, आणि खरिपाची पिके हाती किती प्रमाणात येतात हे आता ठरवणे शक्य नाही. एकूणच यावर्षी शेती उत्पादन जेमतेमच राहण्याची शक्यता जास्त आहे.
-प्रमोद वाघुर्डे, धाड, शेतकरी.