मृत्यूनंतरही ‘छळ’इथला संपत नाही!
By Admin | Updated: September 18, 2014 00:44 IST2014-09-18T00:44:30+5:302014-09-18T00:44:30+5:30
खामगाव तालुक्यातील स्मशानभूमी नसल्यामुळे अनेक गावात प्रेतांची अवहेलना.

मृत्यूनंतरही ‘छळ’इथला संपत नाही!
खामगाव :
सरणावर जातांना
इतुकेच कळले होते..
मरणाने केली सुटका..
जगण्याने छळले होते.
माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला सर्व यातनांतून मुक्ती मिळते असेच उपरोक्त ओळींतून स्पष्ट होते. मात्र, तालुक्यातील अनेक गावांमधील स्मशानभूमीच्या बकाल अवस् थेमुळे माणसांची मरणानंतरही सुटका होत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे वास्तव असून काही ठिकाणच्या स्मशानभूमीवरील शेड नादुरूस्त आहे. तर अनेक गावांमध्ये स्मशानभूमींना जोडणार्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे.
मृत्यू कुणालाही चुकत नाही. हे शास्वत सत्य असून जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्वात शेवटचा सो पस्कर म्हणजे अंत्यसंस्कार हाच आहे. मनुष्याचा शेवट चांगला व्हावा अशीच धारणा प्रत्येकाची असते. तर मृत्यूमुखी पडलेल्या इसमावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार यासाठी जवळच्या नातेवाईकांची धडपड असते. मात्र, स्मशानभूमीच्या बकाल अवस्थांमुळे मृत्यूनंतरही यातना साथ सोडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील १४ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या स्मशानभुमी शेडची दुरवस्था झाल्याने आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे चित्र आहे.
माणूस जिवंत आहे तो पर्यंत सुखा समाधानाने जगण्याचा प्रयत्न करतो. जिवंतपणी विविध समस्यांना तोंड देत जगावे लागत असतांना मरणानंतरही त्या सुटत नाहीत. शासन विविध योजनाव्दारे समाजतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहे. अनेक गावात स्मशानभुमीकडे जाण्याकरिता रस्ता नाही. पाण्याची सोय नाही. लोखंडी शेडची टिनपत्रे खराब झाली तर काही ठिकाणी बेपत्ता आहेत. स्शमान शेडमधील सिमेंटचे फ्लोरींग उखडले आहे. उन्हाळा व पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार करताना नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गावागावातील स्मशानभुमीच्या विकासासाठी व सुविधा पुरविण्यासाठी संबंधितांकडून प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.