बुलडाणा पालिकेतील इंग्रजी माध्यमाला मिळाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:05 IST2020-02-23T15:05:22+5:302020-02-23T15:05:29+5:30
पाच शाळांमध्ये के.जी. वन आणि के.जी. टू चे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षकांची भरती घेण्यात येत आहे.

बुलडाणा पालिकेतील इंग्रजी माध्यमाला मिळाला मुहूर्त
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: नगर पालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून हालचाली सुरू आहेत. अखेर या नाविण्यपूर्ण उपक्रमाला मुहूर्त मिळाला आहे. बुलडाण्यातील पाच शाळांमध्ये के.जी. वन आणि के.जी. टू चे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षकांची भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी बीएड् व एमएड् उमेदवारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
कॉन्व्हेंटची संस्कृती आता खेडोपाडी पोहचली आहे. परंतू अनेक पालक कमकूवत आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलाचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊ शकत नाहीत. तरीसुद्धा काही पालक पोटाला चिमटा घेऊन कॉन्व्हेंटसारख्या ठिकाणी मुलांना घालण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्वसामान्य पालकांच्या मुलांनाही पालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, यासाठी बुलडाणा नगर पालिकेने नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बुलडाणा शहरातील नगर परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून इंग्रजी माध्यमाचे के. जी. वन, के. जी. टू चे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अनुभवी पात्र शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणाऱ्या या शिक्षकांसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर व बीएड् किंवा एमएड् अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.
मंगळवारी होणार शिक्षकांची नियुक्ती
बुलडाणा नगर पालिकेच्या शाळेत के. जी. वन, के. जी. टू च्या वर्गासाठी मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी बीएड् किंवा एमएड् पात्रता असलेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. शिक्षक पदासाठी १२० उमदेवारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ १० उमेदवारांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी मंगळवारी मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.