स्वयंरोजगारातून २६ लाख युवकांना रोजगार
By Admin | Updated: June 24, 2015 01:28 IST2015-06-24T01:28:10+5:302015-06-24T01:28:10+5:30
दोन लाख सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग कार्यरत.

स्वयंरोजगारातून २६ लाख युवकांना रोजगार
बुलडाणा : वस्तुनिर्माण आणि सेवा पुरविणार्या उद्योगांच्या आधारे राज्यातील अनेक बेरोजगार युवकांनी स्वत:साठी रोजगाराची निर्मिती केली आहे. राज्यात असे २ लाख ११ हजार सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग कार्यरत असून, या माध्यमातून २६ लाख ९५ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना केंद्र सरकारकडून विशिष्ट प्रोत्साहन दिले जाते आहे. यासाठी शासनाच्या सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजू व सुशिक्षीत बेरोजगारांसाठी जिल्हा उद्योग केंद्रच्या माध्यमातून लघू उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. वस्तुनिर्माण उद्योग आणि सेवा पुरविणारे उद्योग यात सुक्ष्म, लघु व मध्यम असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, क्रीडा, अन्न, गृहउद्योग, खादी ग्रामउद्योग, दुग्ध व्यवसाय, अभियांत्रिकी, कृषी, गृहनिर्माण आदी क्षेत्रातील मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करुन या तरुणांनी वेगळी ओळख निर्माण केली.
सात वर्षात गुंतवणूक व रोजगार वाढला
सूक्ष्म,लघु व मध्यम उपक्रमांच्या २00६-0७ साली झालेल्या चवथ्या गणनेनुसार राज्यात ३१ मार्च २00७ रोजी एकूण ८६,६६५ उद्योग कार्यरत होते. त्यामधील गुंतवणूक १४,८५९ कोटी रूपये, तर १0.९५ लाख रोजगार होता. गेल्या सात वर्षात यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. २0१४-१५ या आर्थिक वर्षात ५0,६३७ कोटी रूपये गुंतवणुकीचे २,११,४0३ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम कार्यरत असून, त्यामधून २६.९५ लाख रोजगार निर्माण झाला आहे.
रोजगारासाठी जॉब पोर्टल
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून (एमएसएमई) रोजगार मिळवू इच्छिणार्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र पोर्टल सुरू केले. याचा फायदा राज्यातील बेरोजगारांना होणार आहे. उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.
उद्योग व रोजगाराचा विभागनिहाय आलेख (२0१५)
विभाग उद्योग रोजगार
मुंबई २१८९५ ३.६६
कोकण ३४६१३ ५.८४
नाशिक २४२७९ २.९७
पुणे ८३0३३ ९.४२
औरंगाबाद १४८५९ १.७0
अमरावती १0६४२ १.0१
नागपूर २२0८२ २.३५
एकूण २११४0३ २६.९५