वाॅटर पार्कमध्ये महिलांमध्येच जुंपली, परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा
By सदानंद सिरसाट | Updated: September 11, 2023 16:34 IST2023-09-11T16:33:45+5:302023-09-11T16:34:21+5:30
अकोला येथील महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये माउली वाॅटर पार्कमध्ये पोहण्यासाठी गेले असता तेथील खेळणे का बंद आहे, अशी विचारणा तिच्या पतीने संबंधितांना केली.

वाॅटर पार्कमध्ये महिलांमध्येच जुंपली, परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा
खामगाव (बुलढाणा) : शेगावातील वाॅटर पार्कमध्ये आलेल्या महिलेने अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर पार्कमधील सुरक्षारक्षक महिलेने दिलेल्या तक्रारीतही मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोपावरून शेगाव शहर पोलिसांत रविवारी दोन्ही गटातील आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अकोला येथील महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये माउली वाॅटर पार्कमध्ये पोहण्यासाठी गेले असता तेथील खेळणे का बंद आहे, अशी विचारणा तिच्या पतीने संबंधितांना केली. त्यावेळी ज्ञानेश्वर पाटील, ढोले यांच्यासह इतर अनोळखी चौघांनी चापटा, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले.
त्यावरून पोलिसांनी सहाजणांवर भादंविच्या कलम २९४, ३२३, १४३ नुसार गुन्हा दाखल केला, तर पार्कमधील सुरक्षारक्षक महिला गायत्री काळे यांनी दिलेल्या तक्रारीत जगदीश मगर, श्रद्धा मगर यांना तरण तलावात शिस्तीत आंघोळ करा, असे म्हटल्याने त्या दोघांनी वाद घालत लोटपाट केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले. त्यावरून पोलिसांनी मगर पती-पत्नीविरुद्ध २९४, ३२३, ५०४ (३४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.