शेतीचे अर्थकारण धोक्यात?
By Admin | Updated: June 28, 2014 01:42 IST2014-06-28T01:17:55+5:302014-06-28T01:42:26+5:30
पावसाची हुलकावणी; बुलडाणा जिल्हाभरात केवळ तीन टक्के पेरण्या.

शेतीचे अर्थकारण धोक्यात?
बुलडाणा : जिल्हाभरात सर्वत्र पेरण्या खोळंबल्याने पिकांच्या उत्पादनासह त्याच्या दर्जावर व भावावरही परिणाम होणार असल्याची चिंता शेतकर्यांसह व्यापारीवर्गालाही लागली आहे. त्यामुळे लांबलेल्या पावसामुळे शेती व शेतीवर आधारित अर्थकारणच धोक्यात आले आहे.
गेल्या वर्षी वरूणराजाच्या कृपेने सर्वच पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात आल्याने बाजारपेठेत चैतन्य होते. त्यामुळे अन्नधान्यासह सर्व वस्तूंचे भाव आवाक्यात आले व बाजारपेठेत मोठी उलाढाल दिसून आली. यंदा मात्र पावसाळ्य़ाच्या सुरुवातीपासूनच वरुणराजाने हुलकावणी देण्यास सुरूवात केल्याने सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजासह व्यापारी तसेच सर्वसामान्यांना असणार्या महागाईच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. बाजारपेठेत उलाढालही मंदावली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी आपल्याकडे असलेला माल बाजारात आणण्यापेक्षा भविष्याच्या विचाराने तो घरातच ठेवणे पसंत करीत आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे; तसेच ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम नसल्याने तो बाजारात खरेदीसाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, बाजारात आतापासूनच २५ टक्क्याने उलाढाल ठप्प झाली आहे.
जून महिना संपत आला तरी उडीद, मूग, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, करडई या पिकांची अजूनही पेरणी झालेली नाही. ही पेरणी लांबल्याने एक तर त्याच्या उत्पादनात घट येऊन उतारा कमी येऊ शकतो किंवा त्याच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
उत्पादनात घट म्हटली तर मालाच्या भाववाढीचे संकट आहे किंवा दर्जा घसरला तर शेतकर्याला भाव कमी मिळेल किंवा चांगल्या दर्जाचा माल भाव खाण्याची शक्यता आहे. याची व्यापार्यांसह ग्राहकांनाही झळ सोसावी लागणार आहे. मोताळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कपाशीचे पीक वाचविण्यासाठी टँकरने पाणी विकत घेतल्या जात आहे. दोन हजार लिटरचे टँकरसाठी १ ते दीड हजारापर्यंत रक्कम मोजून शेतकरी पीक वाचवित असल्याचे चित्र आहे.
प्रकल्प साठा (दलघमी) टक्केवारी
वन ४0३.३९ ५८.३0
पेनटाकळी ५५६.६0 ३0.२४
खडकपूर्णा ५१८.५१ ५४.३७
मन ३६५.७५ २0.0४
तोरण ४0२.९0 १९.५२
उतावळी ३६३.८४ १९.५६
नळगंगा २९१.८0 ६३.८८
पलढग ४00.४४ ४८.६0
ज्ञानगंगा ४0१.७५ ७0.0६
कोराडी ५४४.३0 ७0.७७
मस ३२२.९४ ५८.७१
* ज्वारी, उडीद, मूग, बाजरी, मका अशा इतर कोणत्याही पिकांची पेरणी झालेली नाही. फक्त कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकर्यांनी पेरणी किंवा लागवडीचे धाडस केले आहे.
**खरीप हंगामाखाली व्यापणार्या सात लाख ४८ हजार ८00 हेक्टर क्षेत्रापैकी फक्त १९ हजार २९१ हेक्टरवर पूर्वहंगामी (बागायती) कापसाची लागवड झाली आहे. उरलेले क्षेत्र तसेच पेरणीविना तसेच पडून आहे.
***१५ दिवसांपासून अन्नधान्याचे भाव स्थिर आहे; मात्र अजून १0 ते १५ दिवस पाऊस लांबला तर आतापासूनच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढून महागाईचे चटके सोसावे लागू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.