खामगावात शासनाच्या निर्णयामुळे टॅक्सी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
By अनिल गवई | Updated: March 27, 2023 16:43 IST2023-03-27T16:42:09+5:302023-03-27T16:43:18+5:30
टॅक्सी धारकांमध्ये सुशिक्षीत बेरोजगारांचा समावेश आहे. काही वर्षापुर्वी कोरोनामुळे टॅक्सीच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता.

खामगावात शासनाच्या निर्णयामुळे टॅक्सी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
खामगाव - एसटी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट व वृध्दांना सवलतीमुळे टॅक्सी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी शिवशक्ती काळी पिवळी टॅक्सी संघटनेकडून बंद पाळण्यात आला.
टॅक्सी धारकांमध्ये सुशिक्षीत बेरोजगारांचा समावेश आहे. काही वर्षापुर्वी कोरोनामुळे टॅक्सीच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. परिस्थितीत काही सुधारणा होत असतांना महाराष्ट्र शासनाने एसटी बसमध्ये महिलांना अधे तिकिट ६५ वर्षावरील वृध्दांना अर्धे तिकिट व ७५ वर्षावरील वृध्दांना मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. त्यामुळे परत टॅक्सीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. पुरेसे प्रवाशी मिळत नसल्यामुळे व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे टॅक्सीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे २७ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत शिवशक्ती काळी-पिवळी टॅक्सी संघटनेने बंद पाळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदान येथे ओळीबध्द वाहने उभी केली होती व उपविभागीय अधिकारी (महसुल) यांना शासनाने सवलतीबाबत पुनर्विचार करावा या मागणीसाठी निवेदन दिले. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष भास्कर आखरे, उपाध्यक्ष प्रविण खिराडे, सहसचिव मनोज धुंकेकर, दिनकर भांबेरे, संजय देवचे, उमेश गव्हादे, शे. अन्वर शे. सलीम, विलास भांबेरे यांच्या सह्या आहेत. निवेदन दिल्यानंतर बंद मागे घेवुन परत प्रवाशांच्या सेवेसाठी टॅक्सी सुरू करण्यात आली.