अतिवृष्टीमुळे ५६ हजार क्विंटल कच्चे बियाणे कमी मिळणार - मोराळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST2020-12-27T04:25:35+5:302020-12-27T04:25:35+5:30
यंदा अतिवृष्टीमुळे बीजोत्पादन कार्यक्रमास फटका बसला का? हो. यंदा जिल्ह्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमास काही प्रमाणात ...

अतिवृष्टीमुळे ५६ हजार क्विंटल कच्चे बियाणे कमी मिळणार - मोराळे
यंदा अतिवृष्टीमुळे बीजोत्पादन कार्यक्रमास फटका बसला का?
हो. यंदा जिल्ह्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमास काही प्रमाणात फटका बसला आहे. १ लाख ७४ हजार ८२५ क्विंटल बियाणे मिळविण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र अतिपावसामुळे यंदा १ लाख १८ हजार क्विंटलपर्यंत बियाणे मिळण्याची अपेक्षा आहे. संपामुळे बीजोत्पादन कार्यक्रमास फटका बसलेला नाही.
जिल्ह्यातील बीजोत्पादनाची क्षमता किती?
बुलडाणा जिल्ह्यात महाबीज अंतर्गत चिखली येथे ८० हजार क्विंटल, मलकापूर येथे २५ हजार क्विंटल, खामगाव येथे १० हजार क्विंटलपर्यंत कच्च्या बियाण्यांपासून गुणवत्तापूर्ण बियाणे बनविण्यात येते. यासोबतच बुलडाणा अर्बनच्या एका प्लांटमधून १५ हजार क्विंटलपर्यंत बियाणे उपलब्ध करण्याची क्षमता आहे.
खरीप हंगामासाठीच बियाणे तयार होते का?
नाही. बुलडाणा जिल्ह्यात खरीप व रब्बी हगामासाठी बियाणे बनविण्यात येते. खरिपासाठी १ लाख ७४ हजार ८२५ क्विंटल, तर रब्बीसाठी ५० हजार क्विंटल बियाणे बनविण्याचे यंदाचे उद्दिष्ट आहे.
भाजीपाला बियाण्यांबाबात नेमकी स्थिती काय?
जिल्ह्यात भाजीपाला बियाणेही महाबीज अंतर्गत तयार केले जाते. मात्र प्रामुख्याने आपल्याकडे संकरित भेंडी, दुधी भोपळा, शिरे दोडका व चोपडा दोडका याला प्राधान्य दिले जाते. भाजीपाल्याचे यंदा ६३ क्विंटलपर्यंत बीजोत्पादन घेतले जाणार आहे. कांद्याचेही बीजोत्पादन १७ हेक्टरपर्यंत केले जाते. प्रामुख्याने चिखली, देऊळगावराजा, मेहकर आणि सिंदखेडराजा या भागात कांद्याचे बियाणे घेतले जाते. १५० ते १७० क्विंटलपर्यंत हे बियाणे तयार होते.
बीजोत्पादन कार्यक्रमात किती शेतकरी सहभागी आहेत?
जिल्ह्यात सहा हजारांच्या आसपास शेतकरी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी असून, त्यांना बाजारभावाच्या तुलनेत २५ टक्के अधिक दर आपल्याकडून दिला जोतो. जवळपास ५० ते ६० कोटींच्या घरात या बीजोत्पादनाच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मोबदला मिळतो.
कोणत्या पिकाचे बीज बदलाचे प्रमाण कमी आहे?
जिल्ह्यात प्रामुख्याने हरभरा पिकाचे बीज बदलाचे प्रमाण कमी असून, ते २० टक्के आहे. रब्बी पिकांचे बीज बदलाचे प्रमाण जिल्ह्यातच तसे कमी आहे. २० ते २५ टक्क्यांच्या आसपास आहे.