जिल्ह्यात वर्षभरात मुलींच्या जन्मदरात घट
By Admin | Updated: April 6, 2017 22:51 IST2017-04-06T22:51:36+5:302017-04-06T22:51:36+5:30
बुलडाणा- जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियान शुद्धपातळीवर राबविण्यात येत असले तरी मुलींच्या जन्मदरात घटच झाल्याने ‘बेटी बचाओ’ अभियानाला धक्का बसला आहे.

जिल्ह्यात वर्षभरात मुलींच्या जन्मदरात घट
‘बेटी बचाओ’ अभियानाला धक्का : भ्रूण हत्येची ३४ प्रकरणे न्यायालयात
बुलडाणा : जिल्ह्यात गत एक वर्षात जन्मलेल्या अपत्यांमध्ये मुलींची संख्या कमी असून, मुलांची अधिक आहे. जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियान शुद्धपातळीवर राबविण्यात येत असले तरी मुलींच्या जन्मदरात घटच झाल्याने ‘बेटी बचाओ’ अभियानाला धक्का बसला आहे. जिल्ह्यात स्त्री-पुरुष जन्माचे प्रमाण २०१६ मध्ये ९१५/१००० एवढे होते; मात्र मार्च २०१७ मध्ये स्त्री-पुरुष जन्माचे प्रमाण ९०३/१००० पर्यंत जिल्ह्यात खाली आले आहे.
आरोग्य विभागाकडून स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमावर भर दिला जात आहे. शिवाय स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक कारवाया करण्यात आल्या. यात ३४ प्रकरणे दाखल आहेत. यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे १४ प्रकरण, जिल्हा न्यायालयाकडे १२ प्रकरण, उच्च न्यायालयात १६ तर सर्वोच्च न्यायालयात १ प्रकरण दाखल आहे.
प्रबोधनात्मक कार्यक्रम व दंडात्मक कारवाया होत असतानाही जिल्ह्यातील मुलींचे घटते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोंदणी प्रमाणे विविध शासकीय रुग्णालयात गत एक वर्षात ३३४६ बाळांचा जन्म झाला. यात मुले १७१८ असून, मुलींची संख्या १६२८ एवढी आहे. या स्त्री-पुरुष जन्मदरात ९० चा फरक आढळून आला आहे.
जिल्ह्यातील घटती मुलींची संख्या चिंतेचा विषय असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागात येणाऱ्या दिवसात महत्वपुर्ण पाऊल उचल्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासन करणार उपाययोजना
जिल्ह्यातील घटता मुलींचा जन्मदर चिंतेचा विषय असून याबाबत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग उपाययोजना करण्याच्या तयार आहे. यात ‘बेटी बचाव’ यासाठी जिल्ह्यात जनजागृती व कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून यात विविध प्रशासनकिय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. याशिवाय स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी व जनजागृतीसाठी राज्याची व जिल्ह्याची टोल फ्रि हेल्पलाईन, तक्रारीसाठी वेबसाईट, बेटी बचाओ बेटी पढाओ टोल फ्रि क्रमांक चालू करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. ए.व्ही.सोनटक्के यांनी सांगितले.