ठिबकवरील पिके ऑक्सीजनवर
By Admin | Updated: June 28, 2014 22:40 IST2014-06-28T22:32:11+5:302014-06-28T22:40:31+5:30
पावसाअभावी शेतकर्यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

ठिबकवरील पिके ऑक्सीजनवर
मोताळा : तालुक्यात मृगनक्षत्र कोरडा गेला असून अपेक्षाकृत पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. आद्रा नक्षत्रातही पावसाचा रूसवा कायम दिसत असून पेरणी योग्य पावसाअभावी शेतकर्यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
मागील काही वर्षापासूनचा पावसाचा लहरीपणा पाहता धूळ पेरणी जरी तालुकयात झाली नसली तरी मृगाच्या भरवश्यावर जवळपास ८ हजाराच्यावर शेतकर्यांनी ठिबक वर कापसाची लागवड केल्याचे समजते. मृगात हमखास पावसाचे आगमन होत असल्याच्या आशेने विहिरीमधील पाण्याच्या भरवश्यावर या भागातील शेतकरी वर्ग ठिबकवर कापासाची लागवड करतो. विहिरीचे पाणी संपेपर्यंत मृगाचा पाऊस येत असल्यामुळे कापासाची पेरणी चांगल्याप्रकारे साधून उत्पादनसुद्धा मोठय़ा प्रमाणात शेतकर्यांना मिळत आले आहे. मात्र यावेळेस मृग कोरडा गेल्यामुळे तालुकाभरातील विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली असून, बर्याच विहिरी आटल्यामुळे शेतकर्यांना हजार ते पंधराशे रूपयांपर्यंत पाणी विकत घेवून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रकार करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाळी वातावरणाअभावी पिकांची वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगत असल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. तालुक्यात पावसाचा थेंबच पडला नसल्यामुळे कापसाच्या मुख्य पिकासह इतर पिकांचासुद्धा मौसम गेल्यामुळे शेतकरी येणार्या पावसावर शेतीचे नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी पडला आहे. कापसाची लागवडीसाठी जूनचा पहिला आठवडा महत्वपूर्ण असून जेवढया लवकर लागवड होईल तेवढे या पिकासाठी फायदयाचे ठरते. जूूनच्या तीसर्या आठवडयापर्यंत केलेली कापसाची लागवड शेतकर्यांसाठी फायदयाची असते. कमी कालावधी मध्ये येणार्या पिकांसाठीसुद्धा हे वर्ष शेतकर्यांसाठी कठीण जात असून पावसाअभावी मुंग, उडीद, मटकी,चवळी आदीं पिकाची लागवड शेतकरी करू शकला नाही. १५ जून ते १५ जुलै या काळात या पिकांची पेरणी होणे आवश्यक असून अल्पकाळामधील हि पिके ६0 ते ७0 दिवसांमध्ये तयार होतात. मात्र या पिकांची पेरणी ३0 जूनच्या आतमध्ये होणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात. मात्र या कालावधीनंतर या पिकांची पेरणी झाल्यास उत्पादन न होता फक्त नासाडी होते. पावसाच्या रूसव्यामुळे शेतकर्यांसह जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वत्र कोरडे वातावरण असल्यामुळे जनजीवनसुद्धा प्रभावीत झाले असून ठिबक वरील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत.