कासारखेड येथे मतदानावरुन वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST2021-01-17T04:29:37+5:302021-01-17T04:29:37+5:30
जानेफळ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका महिलेच्या मतदानावरून वाद झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून ...

कासारखेड येथे मतदानावरुन वाद
जानेफळ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका महिलेच्या मतदानावरून वाद झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान सुरू असताना, एक महिला मतदान करण्यासाठी आली असता, तिला ‘तुझे मतदान मी करतो’, असे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार असलेल्या संतोष बबनराव मवाळ याने म्हटले. त्याला दुर्गादास रुपराव धोंडगे (वय २८) याने विरोध करत ‘ती महिला वृद्ध किंवा दिव्यांग नाही, तिचे मतदान तिलाच करू द्या’, असे म्हटले. त्यामुळे संतोष बबनराव मवाळ व मधुकर सुपाजी मवाळ (दोघे रा. कासारखेड) यांनी ‘या महिलेचे मतदान आम्हीच करणार आणि तुझेही मतदान आम्हीच करू’, अशी धमकी देत धोंडगे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच फिर्यादी संतोष बबनराव मवाळ याच्याशी दुर्गादास रुपराव धोंडगे व सतीश दादाराव सवडदकर हे विविध कारणांवरून वाद घालत होते. दरम्यान, मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जात असताना संतोष मवाळ याला पाहून हे दोघे शिवीगाळ करत होते. यावेळी संतोष याने ‘तुम्ही मला शिवीगाळ कशाबद्दल करत आहात’ असे विचारले असता दुर्गादास रुपराव धोंडगे यानेही संतोष याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार दिलीप मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश डव्हळे करत आहेत.