दिंडी मार्गावर भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:08 IST2017-07-31T01:08:23+5:302017-07-31T01:08:26+5:30

खामगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने, दिंडी मार्गावर भाविकांचा मळा फुलल्याचेच चित्र दिसून आले.

devotes croud on dindi Road | दिंडी मार्गावर भाविकांची मांदियाळी

दिंडी मार्गावर भाविकांची मांदियाळी

ठळक मुद्देश्रींच्या पालखीचे रजतनगरीत भावपूर्ण स्वागत

अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने, दिंडी मार्गावर भाविकांचा मळा फुलल्याचेच चित्र दिसून आले.
भगवान विठ्ठलाचे आषाढी एकादशीला दर्शन घेऊन ही पालखी परतीच्या मार्गाला लागली. दरम्यान, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर श्रींची पालखी शनिवारी सकाळी खामगावात पोहोचली. या ठिकाणी पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले.
मुक्कामी असलेल्या पालखीतील वारकºयांना श्रद्धेचा निरोपही देण्यात आला. दरम्यान, रविवारी पहाटे ५ वाजता श्रींची पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. तत्पूर्वीच खामगाव आणि परिसरातील हजारो नागरिक, भाविक शेगावकडे निघाले होते. खामगाव आणि परिसरच नव्हे, तर, नांदुरा, मलकापूर, चिखली, उंद्री, सिंदखेड राजा, बुलडाणा येथील भाविक खामगावात दाखल झाले. आपली वाहने खामगावात ठेवून, अनेक भाविकांनी दिंडी मार्गावरून माउलींसोबत पायी वारी केली. यामध्ये दिंडी मार्गावर पहिला भाविक पहाटे ४.२३ मिनिटांनी निघाला. त्यानंतर टप्प्याने भाविकांच्या गर्दीत वाढ झाली. शिवराज फॉर्म येथे खा. प्रतापराव जाधव, संतोषसेठ डिडवाणीया, दत्ता पाटील, सुनील अग्रवाल, संजय अवताडे, सुरेश वावगे यांच्यासह शिवसेना पदाधिकाºयांनी पालखीचे स्वागत केले. सकाळी ७.४५ वाजता भाविकांचे एक टोक शेगावात, तर दुसरे टोक खामगावात होते. संत गजानन महाराजांची पालखी १०.३० वाजता जवाहर नवोदय विद्यालयाजवळ पोहोचली. या ठिकाणी असलेल्या उंच लोखंडी पुलावरून श्रींच्या पालखीसह वारकºयांवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. सर्वात शेवटचा भाविक दुपारी १.५५ वाजता शेगावात पोहोचला.
काही बालकांनी आपल्या वडिलांच्या खांद्यावर, तर काहींनी चक्क आई-मावशीने केलेल्या चादरीच्या पाळण्यातून वारी केली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. खामगाव-शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक पहाटे ३ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होती. दुपारी ३.४२ वाजतानंतर शेगाव येथून खामगावसाठी वाहतूक सुरळीत झाली.

दिंडी मार्गावरील गर्दीचा उच्चांक!
श्रींची पालखी शेगावकडे मार्गस्थ झाल्यानंतर खामगाव येथून शेगावकडे जाणाºया भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारीही वाढत्या गर्दीच्या उच्चांकाचा प्रत्यय अनेक भाविकांना आला. गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या संख्येत सारखी भर पडत असल्यामुळे दिंडी मार्गही अरुंद जाणवतो. परिणामी अनेक भाविकांना गर्दीचा त्रास होतो. पालखीसोबत चालत असताना, वाट काढणेही कठीण होऊन जाते. गर्दीमुळे काही भाविक दिंडी मार्गाच्या समांतर असलेल्या शेतातील पाऊलवाटेने संतनगरीत दाखल झाले.

Web Title: devotes croud on dindi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.