धरणात बुडून कोलवड येथील युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 31, 2016 01:24 IST2016-08-31T01:24:25+5:302016-08-31T01:24:25+5:30
बुलडाणा तालुक्यातील घटना.

धरणात बुडून कोलवड येथील युवकाचा मृत्यू
बुलडाणा, दि. ३0: येथून जवळच असलेल्या कोलवड गावातील एका २५ वर्षीय युवकाचा बांध धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे.
बुलडाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या कोलवड येथील किशोर सुरेश पैठणे असे मृताचे नाव असून, त्याचा मृतदेह आज ग्रामस्थांना बांध धरणात आढळून आला. काल २९ ऑगस्ट रोजी दुपारी किशोर पैठणे शेतात गेला होता. परंतु तो परत आला नाही. नातेवाइकांनी व घरच्या मंडळींनी त्याचा बराच शोध घे तला; परंतु तो मिळून आला नाही. दरम्यान, आज काही ग्रामस्थांना बांध धरणात एका युवकाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.
मृतदेह हा किशोर सुरेश पैठणे याचाच असल्याची त्याच्या कुटुंबीयांनी ओळख पटवून दिली आहे. मृताचे वडील सुरेश पैठणे यांनी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. किशोर पैठणे धरणामध्ये कसा गेला, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी किशोर हा पोहण्यासाठी या धरणात गेला असावा, असा अंदाज त्याच्या नातेवाइकांकडून वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.