मोटारसायकल अपघातात नवविवाहित तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 17:16 IST2018-11-22T17:15:53+5:302018-11-22T17:16:22+5:30
मित्रांसमवेत पार्टी करून परत असलेल्या एका नवविवाहित तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली.

मोटारसायकल अपघातात नवविवाहित तरुणाचा मृत्यू
खामगाव : मित्रांसमवेत पार्टी करून परत असलेल्या एका नवविवाहित तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली. दरम्यान, नवविवाहित तरुणाच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना पत्र दिले आहे.
खामगाव तालुक्यातील नांद्री येथील सुधीर अजाबसिंह इंगळे (२६) हा युवक पंचायत समिती जवळ सायबर कॅफे चालवायचा. बुधवारी त्याचा मित्र महादेव मेतकर याचा वाढदिवस होता. नांदुरा रोडवरील एका शेतातील पार्टी संपवून तो एम एच-२८-१६११ या क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे परतत असताना, नांदुरा रोडवरील एका पुलावरून मोटारसायकल खाली कोसळली. यात सुधीर गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर त्याच्या पाठीमागे बसलेला छंगांनी नामक मित्र किरकोळ जखमी झाला. या दुर्देवी घटनेमुळे नांद्रा येथील इंगळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी सुधीरच्या पाठीमागे बसलेल्या छंगाणीसोबतच काही मित्रांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.
नातेवाईकांना घातपाताचा संशय!
सुधीर इंगळे याच्या मृत्यूप्रकरणी घटनास्थळाचे निरिक्षण केल्यानंतर त्याचा भाऊ विलाससिंह रामसिंह इंगळे रा. काळेगाव आणि मावसभाऊ विक्रांत रणवीरसिंह पवार यांनी पोलिस अधीक्षक, पोलिस निरिक्षक पत्र देत घातपाताचा संशयव्यक्त केला आहे. मृतक सुधीरचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे. सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी केली. यापत्रात मृतक सुधीरच्या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत.