घाणीचे साम्राज्य, आरोग्य धोक्यात!

By Admin | Updated: July 25, 2014 00:07 IST2014-07-25T00:07:42+5:302014-07-25T00:07:42+5:30

पावसाळ्यापूर्वीची साफसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील अनेक वार्डात असलेल्या सर्व्हिस नाल्या तुटुंब भरल्या आहेत.

Dangerous Empire, Health Hazard! | घाणीचे साम्राज्य, आरोग्य धोक्यात!

घाणीचे साम्राज्य, आरोग्य धोक्यात!

बुलडाणा : पावसाळ्यापूर्वीची साफसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील अनेक वार्डात असलेल्या सर्व्हिस नाल्या तुटुंब भरल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंंधी पसरली असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच पालिका कर्मचार्‍यांच्या संपाने भर टाकली. दरम्यान दोन दिवसापासून पावसाच्या रिमझिममुळे साथरोग बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलडाणा शहर जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे शहर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु पालिका पदाधिकारी राजकीय फायद्याच्या दृष्टीने काम करतात. त्यामुळे पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांवरील त्याचा धाक कमी झाला आहे. कर्मचारी फक्त अर्थपूर्ण कामाकडे लक्ष देत असल्यामुळे नागरिकांना सुखसुविधा मिळणे कठिण झाले आहे. कचरा जमा करण्यासाठी शहरात फिरणारी घंटागाडी महिना-पंधरादिवसातून कधी कधी दिसते. त्यामुळे अनेक वार्डातील विविध चौकात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. सफाई कामगारांकडे ठेकेदार तसेच पालिका पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेक वार्डातील सर्व्हिस नाल्या तुडुंब भरल्या आहेत. या नाल्यात घाण कुजत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंंधी पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय अंतर्गंंत रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. काही जुन्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर नवीन रस्त्यांच्या दर्जा सुमार असल्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी साचत आहे. त्याचाही परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेली झाडे-झुडपी तोडण्यात न आल्यामुळे कचरा अटकून घाण पाणी रस्त्यावर तुंबत आहे. त्यावर नागरिक व विद्यार्थ्यांंची ये-जा असते. वाहनेही वेगाने धावत असतात. यामुळे घाण पाणी अंगावर उडते. त्याचाही परिणाम आरोग्यावर होत आहे.

** अतिक्रमणामुळे स्वच्छतेचे तीनतेरा

पालिका पदाधिकारी व कर्मचार्‍यांच्या आर्शिवादामुळे शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत. या अतिक्रमणात अनेकांनी हॉटेल, मांसविक्री अशी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे दुकान परिसरात हॉटेलचे घाण पाणी, मांसविक्री दुकान परिसरात मांसाचे तुकडे तसेच फळविक्री दुकान परिसरात सडलेले फळे तसेच कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे बसस्थानक परिसरात घाण वाढली आहे.

** ठेकेदारीत नगरसेवक मालामाल

जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेले नगरसेवक आपल्या परिसरातील पालिकेच्या कामाचे ठेकेदार वनले आहेत. आपल्या वार्डातील कामे मंजूर करायचे, ते काम स्वता: करायचे, त्यासाठी निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरायचे व मालामाल व्हायचे, असा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे शहरात तयार होणार्‍या सिमेंट रस्त्यावर खड्डे पडले असून सर्वत्र धूळ उडत आहे.

** सफाई कामगारांच्या संपाचा परिणाम

आपल्या विविध १४ मागण्यासाठी राज्यभरातील नगर पालिकेचे सफाई कामगार २१ जुलै पासून संपावर गेले आहेत. कोणतेही सफाईचे काम न करण्याचा सफाई कामगार संघटनेने निर्णय घेतल्याने शहरातील साफसफाईची सर्व कामे ठप्प आहेत. बुलडाणा नगर पालिकेतील जवळपास १२१ सफाई कामगार या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शहरातील सफाईची कामे बंद असल्याने सर्वत्र कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Web Title: Dangerous Empire, Health Hazard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.