अवकाळी पावसामुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST2021-03-22T04:31:22+5:302021-03-22T04:31:22+5:30
बुलडाणा जिल्ह्यात १८ मार्चपासून अवकाळी पावसाने कृषी क्षेत्राला तडाखा दिला असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे ...

अवकाळी पावसामुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
बुलडाणा जिल्ह्यात १८ मार्चपासून अवकाळी पावसाने कृषी क्षेत्राला तडाखा दिला असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मलकापूर, मोताळा, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या नऊ तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. १८ ते १९ मार्चदरम्यान या तालुक्यातील २ हजार ८१२ हेक्टवरील पिकाचे नुकसान झाले होते. जवळपास १०० गावांतील ४ हजार ४३३ शेतकरी त्यामुळे प्रभावित झालेले आहेत. यात प्रामुख्याने एकट्या मेहकर तालुक्यात दोन हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यानंतर २० व २१ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४ हजार ११२ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यात ५ हजार ४०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने खामगाव तालुक्यात या पावसाने मोठा फटका दिला. १०९ गावांत या अवकाळी पावसाने कहर केला आहे. १८ मार्च ते २१ मार्चदरम्यान झालेल्या एकंदरीत नुकसानाचा विचार करता ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या कृषी विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे गावपातळीवर जाऊन झालेल्या नुकसानीचा एकंदरीत अंदाज घेत आहेत.
दरम्यान, गेल्या खरीप हंगामातही तब्बल ७४ हजार हेक्टरवर अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा जादा पावसामुळे म्हणा जिल्ह्यात नुकसान झाले होते. त्यानंतर उन्हाळ्यात हा फटका पावसाने दिला आहे.
--या पिकांचे झाले नुकसान--
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, मका, गहू, केळी, पेरू, आंबा, भाजीपाला फळपिके, भुईमूग, ज्वारी, केळी, पपई, टरबूज, हरभरा, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. गारपीट व पावसामुळे आंब्याचा मोहरही गळून पडला असून, काही ठिकाणी कोयीने जाळे पकडलेल्या आंब्याला मोठा फटका बसला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
--नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -शिंगणे
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनास दिले आहेत. या अवकाळी पावसामुळे गहू, शाळू, कांदा बीज, भाजीपाला, शेडनेट व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरीबांधव पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर तात्काळ जाऊन सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. सोबतच शेतकऱ्यांना नुकसानापोटी योग्य ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.