चिखली तालुक्यातील आमखेड येथील गावतलाव पावसामुळे फुटला होता. या तलावातील पाणी आणि कोराडी नदीला आलेल्या पुराने रौद्ररूप धारण केले. पात्र सोडून पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिके वाहून गेली तर नदी, नाल्या काठची शेकडो एकर जमीन खरडून गेली होती. त्या पार्श्वभूमीवर २९ जून रोजी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख, तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, मंडल अधिकारी राजू आव्हाळे, पटवारी कल्पना कोलते, प्रशांत पोंधे, समाधान वाघ, गणेश बंगाळे, शरद पवार यांनी मोहाडी, राताळी, सवडद येथील बाधित भागाची पाहणी केली. तेजराव देशमुख, शिवाजी लहाने, अशोक रिंढे, अलका लव्हाळे, विलास रिंढे, नंदकिशोर रिंढे, दिलीप काळे, पवन देशमुख, गुलाबराव देशमुख, गजानन देशमुख, विशाल देशमुख, राधाबाई देशमुख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आहेत. जवळपास १५० शेतकऱ्यांच्या जमिनी पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्या. दरम्यान, नदी, नाल्या काठच्या खरडून गेलेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार सुनील सावंत यांनी दिले आहेत.
...तो पूलही गेला वाहून--
सवडद ते गजरखेड रस्त्यावरील थोडाफार उरलेला पूलही या पावसामुळे वाहून गेला आहे. त्याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तात्पुरती व्यवस्था म्हणून हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग खुला करेल, अशी माहिती यावेळी दिनकरराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिली.