कपाशी सुकू लागली!
By Admin | Updated: July 31, 2014 01:26 IST2014-07-31T01:23:37+5:302014-07-31T01:26:48+5:30
जामोद परिसरातील चित्र : शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण.

कपाशी सुकू लागली!
जामोद : जामोद परिसरातील अनेक शेतकर्यांच्या शेतातील उभे कपाशीचे पीक अचानक सुकू लागले आहे. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून संबंधित कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
परिसरातील अनेक शेतकर्यांनी पाऊस येण्यापूर्वीच धुळ पेरणी केली. काही शेतकर्यांनी ठिंबक सिंचनावर कपाशीची पेरणी केली. मात्र, तब्बल दीड महिना पावसाळा लांबल्यामुळे धुळ पेरणी केलेल्या शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. तर ठिंबक सिंचनावर कपाशी पेरणी केलेल्या शेतकर्यांना विहिरीचे पाणी कमी पडले. अशाही परिस्थितीत शेतकर्यांनी जीवापाड मेहनत करीत पिके जगविली. पंरतु, आता ही पिकेही सडू लागल्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या शेतातील वाढलेली कपाशी मोठी झाल्यानंतर तिला सडवा लागला आहे. त्यामुळे अस्मानी संकटात हे शेतकरी सापडले असून जामोद परिसरातील अनेक शेतकर्यांसह जगन्नाथ गोविंदा हिस्सल, राजु बांधीरकार, दीपक बांधीरकार यांच्या शेतातील हिरवी कपाशी सुकू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही बाब संबधीत शेतकर्यांनी कृषी विभागाला कळविली. त्यानुसार कृषी अधिकारी राऊत, मंडळ कृषी अधिकारी इंगळे, कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ज्ञ उमाळे, कृषी सहाय्यक शेगोकार, तलाठी श्रीनाथ यांनी पाहणी केली. गत वर्षापासून शेतकर्यांवर अस्मानी तसेच सुलतानी संकटांची मालिकाच सुरू आहे. गारपीट, अतवृष्टी यामुळे पिकांना फटका बसत असल्यामुळे प्रचंड अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. यासंदर्भात जगन्नाथ हिस्सल यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी निवेदन सादर केले असता दीड महिन्याच्या उघडीपनंतर अचानक २२ ते २४ जुलै दरम्यान अतवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या वेगवान वार्यामुळे कपाशीच्या मुळाने सड धरली असल्याचे मत कृषी अधिकारी किशोर राऊत यांनी व्यक्त केले.