शेगावला पर्यटकांची गर्दी

By Admin | Updated: August 18, 2014 23:45 IST2014-08-18T23:08:30+5:302014-08-18T23:45:59+5:30

सलग सुट्यांमुळे शहर झाले पॅक

A crowd of tourists in Shegah | शेगावला पर्यटकांची गर्दी

शेगावला पर्यटकांची गर्दी

शेगाव: स्वातंत्र्यदिन, शनिवार अर्धा दिवस सुटी, रविवारची हक्काची सुटी आणि सोमवारी पारशी नववर्षदिनाची सुटी या सलग सुट्यांमुळे शेगाव शहर पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. सुट्यांच्या पृष्ठभूमीवर हॉटेल्स आणि दुकानेही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.
सलग सुट्या आल्याने पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची शहरात तुडुंब गर्दी झाली आहे. स्वातंत्र्यदिन, शनिवार, रविवार व पतेती या सुट्या जोडून आल्याने, पर्यटकांची मोठी वर्दळ या शहरात झाली आहे. संतनगरी शेगाव हे प्रतिपंढरपूर मानल्या जाते याशिवाय आध्यात्म आणि विज्ञानाच्या धर्तीवर या ठिकाणी उभारण्यात आलेले मनोहारी उद्यान आनंद सागर आज संपूर्ण देशवासीयांचे लक्ष केंद्रित करीत आहे. यामुळे या शहरात सुट्या घालविण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद यासह मोठमोठय़ा शहरातून पर्यटक शेगावकडे आकर्षित होत असतात. श्री संत गजानन महाराजांचे समाधी दर्शन या शिवाय पर्यटन ही दोन्ही कामे एकाच शहरात होत असल्याने या शहराला पर्यटकांनी पसंती दिली आहे. मागील दोन दिवसांपासून शहर वाहनांनी गजबजलेले असून, सर्व रस्त्यांच्या बाजूला वाहने उभी असल्याचे दिसत आहे. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने वाहनांसाठी नो-एंट्री केली आहे. पर्यटकांच्या वाढत्या गाड्यांच्या संख्येने शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. गर्दीने वाहन कोंडीचे प्रश्न निर्माण होत आहेत. पोलिस यंत्रणाही तत्पर राहून ही कोंडी काढण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत; परंतु ते तोकडे पडताना दिसत आहेत. नजरेलाही साठविता न येणारे, उत्कृष्ट कलाकृतीच्या अजोड कारागिरीने मन थक्क करणारे व सर्वधर्मसमभाव जपणारे शेगावचे आनंद सागर या आध्यात्मिक व मनोहारी उद्यानाला या वर्षी आतापर्यंत एक कोटीच्यावर भाविक व पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. या आकड्यांवरुन मागील ८ वर्षात पर्यटकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

Web Title: A crowd of tourists in Shegah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.