संततधार पावसामुळे पिकांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST2021-09-25T04:37:20+5:302021-09-25T04:37:20+5:30

लोणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस हाेत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांना जोडणारे ...

Crops stagnated due to incessant rains | संततधार पावसामुळे पिकांत साचले पाणी

संततधार पावसामुळे पिकांत साचले पाणी

लोणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस हाेत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांना जोडणारे मुख्य रस्ते, पूल वाहून गेले आहेत. सततच्या रिपरिपमुळे कापूस, ज्वारी, मका, बाजरी, उडीद, भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. टिटवी परिसरात २३ सप्टेंबर राेजी झालेल्या जाेरदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने चार तास वाहतूक खाेळंबली हाेती.

लाेणार तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी साेयाबीनची पेरणी केली आहे. सध्या साेयाबीन तयार झालेले असतानाच सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे साेयाबीनचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पेरणी झालेल्या कपाशीला कैऱ्या लागलेल्या आहेत. मात्र सततच्या पावसामुळे कैऱ्या सडत आहेत. फुटलेला कापूस पावसाच्या पाण्याने ओला होऊन काळा पडत आहे.

बाजरीचेही माेठ्या प्रमाणात नुकसान

कापणी केलेले बाजरीचे पीक पावसाच्या पाण्यामुळे धोक्यात आले आहे. कापलेल्या बाजरीला कोंब फुटत आहेत. उडदाच्या पक्क्या झालेल्या शेंगा पावसाच्या पाण्याने सडत आहेत. मका पिकावर अळी पडल्यामुळे या पिकाचे जवळपास नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक पूर्णपणे काळे झाले होते. यावर्षीसुद्धा हीच परिस्थिती होती की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

लघुप्रकल्प, गाव तलाव ओव्हर फ्लाे

दमदार पावसामुळे तालुक्यातील टिटवी, शिवणीजाट, जांभूळ, गायखेड, हिरडव, गुंधा, देऊळगाव कुंडपाळ, तंबोला हे पाझर तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. तालुक्यातील नाले खळखळ खळून वाहत आहेत. तसेच, मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे.

कोट..

सतत तीन ते चार दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने काढणीसाठी आलेले उडदाचे पीक पूर्णपणे खराब झाले आहे. पाठोपाठ सोयाबीनसुद्धा खराब होण्याच्या मार्गावर आहे.

शेख एजाज खान, शेतकरी

अनेक गावांमध्ये पुराचा धाेका

गुरुवारी दुपारी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. टिटवी येथील पाझर तलाव ओव्हर फ्लाे झाल्यामुळे टिटवी गावालगत तब्बल चार ते पाच तास वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे पुलाच्या दाेन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. नदीकाठावरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सरपंच भगवानराव कोकाटे यांनी केली आहे.

Web Title: Crops stagnated due to incessant rains