गोगलगायीमुळे सिंदखेड राजात ३५ हेक्टरवर पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 19:18 IST2022-09-21T19:18:25+5:302022-09-21T19:18:58+5:30
ऑगस्ट महिन्यात सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळसह लगतच्या परिसरा तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांच्या पिकाचे गोगलगायीने नुकसान केल्याचे समोर आले होते.

गोगलगायीमुळे सिंदखेड राजात ३५ हेक्टरवर पिकांचे नुकसान
बुलढाणा - जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ८८ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असला तरी यंदा प्रथमच गोगलगायीमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये सिंदखेड राजा आणि देऊळागव राजा तालुक्यातील जवळपास ४० शेतकऱ्यांचे ३५.२९ हेक्टवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनुषंगीक नुकसानाचा अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला असल्याची महिती सुत्रांनी दिली.
ऑगस्ट महिन्यात सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळसह लगतच्या परिसरा तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांच्या पिकाचे गोगलगायीने नुकसान केल्याचे समोर आले होते. सोयाबीनची पाने गोगल गायीने खाऊन टाकल्याचे शेतकरी सांगत होते. यासंदर्भता माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही या भागात जाऊन पहाणी केली होती. त्यानंतर तहसिलदार सुनील सावंत यांच्याकडेही शेतकऱ्यांनी याप्रकरणी तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली होती.
ऑगस्ट अखेर कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही शेतात जाऊन पहाणी केली होती. त्यांतर नुकसान भरपाईचा जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी एस. जी. डाबरे, जिल्हा परिषदेच्या सीईओ भाग्यश्री विसपूते आणि जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती या तिघांच्या सह्या असलेल्या नुकसान भरपाईचा अहवाल वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सिंदखेड राजात ३८ शेतकऱ्यांचे नुकसान
एकट्या सिंदखेड राजात गोगाल गायीमुळे ३८ शेतकऱ्यांचे ३४.८९ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. तर देऊळगाव राजा तालुक्यातील २ शेतकऱ्यांचे ०.४० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. दोन्ही नुकसानाचा विचार करता ४ लाख ८५ हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज यामध्ये कृषी विभागाने काढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे.