एका आदर्श गावाची निर्मिती..
By Admin | Updated: August 10, 2014 18:21 IST2014-08-10T18:21:08+5:302014-08-10T18:21:08+5:30
बुलडाणा अर्बनचा उपक्रम : डोंगरखंडाळा गावाची वाटचाल शहरीकरणाकडे

एका आदर्श गावाची निर्मिती..
बुलडाणा: चकचकीत सिमेंटचे रस्ते, रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणार्या नाल्या, रस्त्यालगत बहरलेली जांभळाची झाडे, पाच रुपयात १५ लीटर शुद्ध पाणी देणारे एटीएम, सूतगिरणी, कापडगिरणी, सिमेंटचे छत असलेली घरकुले, हे चित्र एखाद्या शहरातील नाही, तर बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावाचे हे बदललेले रूप आहे. संपूर्ण आशिया खंडात सोशल बँकिंगचा वस्तुपाठ घालून देणार्या बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने घेतलेल्या ग्राम समृद्धीच्या ध्यासाचे हे वास्तव स्वरूप आहे. खेड्यांमध्ये शहरांमधील सुविधा उपलब्ध करून देत, ग्रामीण भागातून शहरांकडे वाहणारे लोंढे थांबवून शहरांचे बकालीकरण रोखण्याची चर्चा अलीकडे सुरू झाली आहे. हा विकास अवघ्या पाच कोटी रुपयांमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने डोंगरखंडाळा गावात त्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. केवळ शहरी भागातील सुविधा उपलब्ध करून देण्यावरच हा प्रयोग थांबलेला नाही, तर गावाचा आर्थिक विकास घडवित गावातच रोजगार निर्मितीचाही प्रयत्न सुरू आहे. एखाद्या पतसंस्थेने स्वयंस्फूर्तीने गावाचा विकास करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न असावा.
बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी डोंगरखंडाळा या त्यांच्या जन्मगावाचा विकास करण्याचा ध्यास घेतला. ग्रामस्थांना विश्वासात घेतले व गावकर्यांकडून एक रुपयाचीही मदत न घेता, फक्त त्यांच्या सहकार्यातून गावात विकासाचे पर्व सुरू केले आहे. पतसंस्थेने गावातील रस्त्यांपैकी ८0 टक्के रस्ते सिमेंटचे केले आहेत. स्वच्छतेतून समृद्धीचा वसा अधिक बळकट व्हावा म्हणून गावात शौच्चालय बांधणार्या प्रत्येक कुटुंबास संस्थेकडून दोन हजार रुपये अनुदान दिले जाते. आतापर्यंत ३४८ कुटुंबांनी या अनुदानाचा लाभ घेतला आहे. रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यांवर विशेष भर देत असतानाच, संपूर्ण गावात जांभळाची तब्बल १,२00 झाडे लावण्यात आली आहेत. जांभूळ हे मधुमेहावरील प्रभावी औषध मानल्या जात असल्याच्या पृष्ठभूमीवर, भविष्यात हे गाव मधुमेहमुक्त व्हावे, हा संदेश देण्यासाठीच जांभळाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्याच्या घरासमोर जांभळाचे झाड लावले आहे, त्याने ते झाड एक वर्ष जगविल्यास त्याला संस्था एक हजार रुपये बक्षीस देणार आहे. त्यामुळे लावलेली सर्व झाडे डौलाने बहरत आहेत. याबाबत या गावचे सरपंच किशोर चांडक यांनी सांगितले की, ही संपूर्ण संकल्पना राधेश्याम चांडक यांची असली तरी, यामागील तांत्रिक जबाबदारी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी सांभाळली आहे. त्यांनी या गावासाठी अनेक उपक्रम संकल्पित केले असून, येणार्या काळात डोंगरखंडाळा हे महाराष्ट्रातील मॉडेल गाव म्हणून समोर येईल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.