टूनकी-जळगाव रस्त्यावर अपघातात तेल्हारा तालुक्यातील दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 15:36 IST2021-07-01T15:31:37+5:302021-07-01T15:36:26+5:30
Accident News :टूनकी ते जळगाव रस्त्यावरील लाडणापूर जवळ ही घटना घडली.

टूनकी-जळगाव रस्त्यावर अपघातात तेल्हारा तालुक्यातील दाम्पत्य ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूरः टूनकी ते जळगाव रोडवर चार चाकी व दूचाकी वाहनांची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात पती पत्नी ठार, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान लाडणापुर फाट्याजवळ घडली. टूनकी कडून एम एच १५ ई जी १९६१ क्रमांकाचे चार चाकी वाहन जळगाव कडे जात होते. तर एम एच ३० पी ५६४९ क्रमांकाची दुचाकी जळगाव कडून टूनकी कडे येत असताना दोघांमध्ये समोरा समोर अपघात घडला. या अपघातात दूचाकीवरील पती-पत्नी ठार झाले आहे. तर चार चाकी वाहन चालक जखमी झाला आहे. मृतकामध्ये तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील गोविंदा किसन तायडे ६० वर्ष व पत्नी प्रमीला तायडे या दोघांचा समावेश आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत अत्यवस्थ अवस्थेत पडलेल्या दोघांना रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे हलविले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले होते. डॉक्टरांकडून प्राप्त माहितीनुसार गोविंदा तायडे यांच्या छाती व हाताला जबर मार लागला तर प्रमिला तायडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने अपघाताच्या अर्ध्या तासातच दोघांचा मृत्यू झाला. तर चार चाकी वाहन चालकाला पोलिसांनी जखमी अवस्थेत सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला शेगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.