Coronavirus: Waiting for the report of that 'dead patient' | Coronavirus : त्या’ मृत रुग्णाच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा

Coronavirus : त्या’ मृत रुग्णाच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कथितस्तरावरील कोराना संशयित रुगणाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असली तरी मृत व्यक्तीच्या गळा आणि नाकाच्या स्वॅबच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली.
सौदी अरेबियातून बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात गावी परत आलेल्या ७१ वर्षीय  कोरोनाच्या संशयित रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारादरम्यान १४ मार्च रोजी मृत्यू झाला आहे. मधुमेहास, ह्रदयरोग आणि श्वसनाचा आजार या रुग्णास होता. खासगी रुग्णालयातून त्यास  जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. १४ मार्च रोजीच ‘हार्ड अ‍ॅन्ड फास्ट’ तत्वावर या रुग्णाचे गळा व नाकातील स्वॅबचे नमुने नागपूर येथे थेट आरोग्य विभागाच्या कर्मचाºयामार्फत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, १५ मार्च रोजी सायंकाळी किंवा १६ मार्च रोजी त्याचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबियांसह  संबंधीत व्यक्तींना आरोग्य विभाग मॉनिटरींग करत असून  आजारी असलेल्यांना विलकीकरण कक्षात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच अन्य व्यक्तींना होम क्वारंटीन करण्याचे सुचित केले असून आरोग्य विभागाचे एक पथक त्यानुषंगाने स्क्रीनींग करत आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनीही जोपर्यंत या प्रकरणात अहवाल प्राप्त होत नाही, तोवर कुठलेही अधिकृत स्टेटमेंट करता येणार नाही. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनावर भर द्यावा.

सुरक्षा किटद्वारेच शवविच्छेदन
मृत्यू झालेल्या या संशयित रुग्णाचे शवविच्छेदनही डॉक्टरांनी सुरक्षा किटचा वापर करूनच केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली. संशयित रुग्णांची ज्या प्रमाणे विलगीकरण कक्षात काळजी घेतली जाते, त्याच पद्धतीने शवविच्छेदन करतानाही आरोग्य विभागाकडून योग्य काळजी घेण्यात येत असल्याचेचेही त्यांनी सांगितले. सुरक्षेबाबत कुठल्याही उणिवा राहणार नाही, याची काळजीही घेण्यात आली.

 
नागरिकांनी सतर्कता बाळगावी. गर्दीची ठिकाणे टाळावी. हातांची स्वच्छता राखावी. परिसरही स्वच्छ ठेवावा. हात पाण्याने व साबणाने धुबावे. साधा रुमालही मास्क म्हणून वापरला तरी चालतो. श्वसन संस्थेशी संबंधीत आजार असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करावी. कोरोना व्हायरसचा रिस्क पिरेड हा १४ दिवसांचा आहे. त्यानुषंगानेही नागरिकांनी काळजी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
- डॉ. प्रेमचंद पंडीत
जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

Web Title: Coronavirus: Waiting for the report of that 'dead patient'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.