Coronavirus : मुंबईहून परतलेली आठ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:38 IST2020-05-15T10:37:51+5:302020-05-15T10:38:00+5:30
पांग्रा येथे मुंबईवरून आलेल्या एका कुटुंबातील आठ वर्षीय मुलगी ही कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली आहे.

Coronavirus : मुंबईहून परतलेली आठ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर पांग्रा: सिंदखेड राजा तालु्क्यातील मलकापूर पांग्रा येथे मुंबईवरून आलेल्या एका कुटुंबातील आठ वर्षीय मुलगी ही कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली आहे. त्यामुळे मलकापूर पांग्रा गट ग्रामपंचायतीमधील पांग्रा हे गाव सील करण्यात आले आहे. सोबतच या मुलीच्या संपर्कात आलेल्या २१ जणांना क्वारंटीन करण्यात येवून त्यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.
कोरोना संसर्ग झालेली मुलगी ही किडनीच्या आजाराने ग्रस्त असून १३ मे रोजी या मुलीसह तिचे कुटूंब हे मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयातून मलकापूर पांग्रा या त्यांच्या गावी पोहोचले होते. ११ मे रोजी आजारी मुलगी ही उपचार घेत असलेल्या त्या रुग्णालयात तिचा स्वॅब घेण्यात आला होता. दरम्यान, तिचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली. संबंधीत रुग्णालयाकडून बुलडाणा जिल्ह्यात याची माहिती देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. सध्या मलकापूर पांग्रा गाव सील करण्यात येऊन परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
कोरोना पॉझीटीव्ह आलेली मुलगी ही आठ वर्षाची असून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. १२ मार्च रोजी तिला तिचे कुटुंबिय मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. तेथून ते १३ मे रोजी परत पांग्रा येथे आले.
२,५६४ नागरिकांची होणार तपासणी
मलकापूर पांग्रा ही गट ग्रामपंचायत असून पांग्रा गावाची लोकसंख्या ही सुमारे २,५६४ च्या आसपास आहे. त्यामुुळे हे क्षेत्र आता प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून ४९६ घरातील नागरिकांची आगामी १४ दिवस दहा आरोग्य पथकाद्वारे नियमित तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग झालेली मुलगी व तिच्या कुटुंबियांना बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
२१ जण क्वारंटीन
मलकापूर पांग्रा येथील या मुलीच्या व तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेले १९ जण व पळसखेड झाल्टा येथील दोघा जणांना आरोग्य विभागाने क्वारंटीन केले आहे. यातील हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांना बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्य व्यक्तींना गावातच होम क्वारंटीन करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.