CoronaVirus in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चार पॉझीटीव्ह; संख्या २१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 16:00 IST2020-04-14T15:58:41+5:302020-04-14T16:00:53+5:30
मलकापूर येथील व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील तिघांचा तर बुलडाण्यातील एकाचा यात समावेश आहे.

CoronaVirus in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चार पॉझीटीव्ह; संख्या २१ वर
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली असून १४ एप्रिल रोजी चौघांचे नमुने पॉझीटीव्ह आले आहे. दरम्यान, या मध्ये मलकापूर येथील व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील तिघांचा तर बुलडाण्यातील एकाचा यात समावेश आहे.
परिणामी बुलडाणा जिल्ह्याची चिंता आता वाढली आहे. मलकापूर येथे दहा एप्रिल रोजी एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आढळला होता. त्याच्या संपर्कातील आणखी तीन जण पॉझीटीव्ह आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पॉझीटीव्ह आलेले तीनही जण हे मलकापूरमधील रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. दरम्यान, एक जण बुलडाण्यातील असून तो नेमका कोण आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या ही २१ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यामध्ये सध्या कोरोना संसर्ग झालेले व्यक्ती आढळून आले आहेत. त्यामुळे या सातही तालुक्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. यामध्ये मलकापूर, खामगाव, शेगाव, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष खामगाव शहरात कोरोना संसर्ग झालेला व्यक्ती आढळला नसला तरी खामगाव पासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेल्या चितोडा गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आहे. अन्य व्यक्ती हे मलकापूर, शेगाव, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा येथील आहेत.