CoronaVirus in Buldhana : धोका कायम; जुलैपर्यंत यंत्रणा अलर्टवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:01 IST2020-04-27T11:00:57+5:302020-04-27T11:01:31+5:30
दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात ही साथ पुन्हा पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

CoronaVirus in Buldhana : धोका कायम; जुलैपर्यंत यंत्रणा अलर्टवर
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साथ नियंत्रणात असली तरी जून, जुलै महिन्यापर्यंत आरोग्य यंत्रणेला साथीच्या संदर्भाने अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. साधारणत: संसर्ग जन्य आजाराच्या साथी या दोन टप्प्यात यापूर्वी आल्याचा अनुभव पाहता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात ही साथ पुन्हा पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे, अशा सुचना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिल्या आहे.
येथील स्त्री रुग्णालयामध्ये २५ एप्रिल रोजी देऊळगाव राजा, मलकापूर आणि चिखली येथील बरे झालेल्या तीन रुग्णांना सुट्टी देण्यात आली. त्यावेळी कोवीड-१९ विशेष रुग्णालयातील परिचारिका तथा डॉक्टरांशी चर्चा करताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली.
जागतिकस्तरावर जून, जुलै दरम्यान, कोरोना संसर्गाची साथ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असली तरी कोरोना संसर्गा संदर्भाने असलेली लक्षणे दुर्लक्षीत करून चालणार नाही. कोरोना संसर्गाशी साधर्म्य असणारी लक्षणे असल्यास अशा व्यक्तीला वेळेत उपचार मिळाले पाहिजे.
सध्या स्थिती नियंत्रणात असल्याने प्रसंगी काहीशी शिथीलता आरोग्य यंत्रणेत येण्याची शक्यता पाहता याबाबत आरोग्य यंत्रणेला त्यांनी अलर्ट केले. विशेष म्हणजे कोरोना संसर्गावर वेगळा असा उपचार तुर्तास तरी नाही. केवळ ‘क्लिनिकली प्रोटोकॉल’ पाळत रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे एखादवेळी अत्यंत गंभीर स्थितीत गेल्यावर रुग्णा सापडून अडचण निर्माण होण्यापेक्षा प्राथमिकस्तरावरील लक्षणामध्येच तो सापडून त्याच्यावर योग्य उपचार करणे शक्य होईल, या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे, अशी भूमिकाही यासंदर्भात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांना विचारणा केली असता ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी स्पष्ट केली.
ही साथ पुन्हा पोषक वातावरण मिळाल्यास दुसºया टप्प्यात येऊ शकते. प्रामुख्याने थंड प्रदेश आणि वृद्ध लोकसंख्या असलेल्या भागात त्याची व्यापकता अधिक राहू शकते. व्हायरसही तसा लगेच नष्ट होऊ शकत नाही. काही काळ तो राहतो. त्यामुळे यंत्रणांसह सामान्य माणसांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
मलकापुरमधील सहा जण हॉस्पीटल क्वारंटीन
जळगाव खान्देश येथे तपासणीदरम्यान पॉझीटीव्ह आलेल्या मलकापूर शहरातील हनुमाननगर भागातील महिलेच्या संपर्कातील सहा जणांना हॉस्पीटल क्वारंटीन करण्यात आले आहे. यासोबतच खामगाव येथे दोन, शेगाव येथील एक आणि देऊळगाव राजा येथील एकालाही क्वारंटीन करण्यात आले आहे. या सर्वांचेही स्वॅब नमुने हे अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. एकंदरीत एकाच दिवशी जवळपास २३ जणांचे स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
गेल्या सहा दिवसात जिल्यातून पाठविण्यात आललेले ३४ स्वॅब नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या २० जणांपैकी १४ जणांची रुग्णालयातून सुटी झाली आहे. एकंदरीत या या दोन्ही बाबी जिल्ह्याला दिलासा देणाºया आहेत. मात्र दुसरीकडे मलकापूर शहरातील दोन महिला या दुसºया जिल्ह्यात तपासणीदरम्यान पॉझीटीव्ह आल्या आहेत.
स्त्री रुग्णालयात लवकरच सेंट्रल आॅक्सीजन सुविधा
कोरोना संसर्गाचे रुग्ण जेथे ठेवल्या जात आहे त्या स्त्री रुग्णालयामध्ये सेंट्रल आॅक्सीजन सुविधा लवकरच उपलब्ध होत आहे. त्याचे कामही सध्या वेगाने सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे प्रसंगी गंभीर रुग्णास त्वरित आॅक्सीजन सुविधा उपलब्ध करणे शक्य होईल. सध्या या रुग्णालयात सहा जणांवर उपचार करण्यात येत आहे.
‘त्या’ ०६ जणांचेही स्वॅब नमुने पाठवले
जळगाव खान्देश जिल्ह्यात तपासणीदरम्यान पॉझीटीव्ह आलेल्या वृद्ध महिलेच्या मलकापूर येथील संपर्कातील सहा जणांचे स्वॅब नमुने अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. २७ एप्रिल रोजी त्यांचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.
कामठीतीलही १३ जणांचे स्वॅब पाठविले
जिल्ह्यात अडकलेल नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील संदिग्ध १३ जणांचेही स्वॅब नमुने २६ एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.त्यांचाही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.