CoronaVirus in Buldhana : १७ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:33 IST2020-04-04T10:33:38+5:302020-04-04T10:33:47+5:30
तीन एप्रिल रोजी आणखी एकाचा स्वॅब नमुना तपासणीस पाठवला आहे.

CoronaVirus in Buldhana : १७ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील एकाचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या घेण्यात आलेल्या स्वॅब नमुण्यांपैकी तीघांचे अहवाल हे निगेटीव्ह आल्याने बुलडाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या १६ जणांचे स्वॅब नमुन्याचे अहवाल प्राप्त झालेले नाही. त्याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोबतच तीन एप्रिल रोजी आणखी एकाचा स्वॅब नमुना तपासणीस पाठवला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातून आतापर्यंत ६९ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील विषाणऊ प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. पैकी ५३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्याप १६ जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. वर्तमान स्थितीत बुलडाणा शहरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या पाच आहे. यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुरूवारी दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १६ जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बुलडाण्यात खऱ्या अर्थाने कम्युनीट स्प्रेडचा धोका आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल. तुर्तास बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती तशी स्टेबल असल्याचे चित्र आहे, असे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले.
दुसरीकडे जिल्ह्यात होम क्वारंटीनमध्ये एकूण ७६ व्यक्ती असून हॉस्पीटल क्वारंटीनमध्ये आजच्या स्थितीत २४ व्यक्ती आहेत तर आयसोलेशन कक्षामध्ये १२ जण आहे. शुक्रवारी यामध्ये दोघांची वाढ झाली आहे. यात बुलडाण्यात सात, खामगावात तीन आणि शेगावात दोन व्यक्ती आयसोलेशन कक्षामध्ये आहेत. होम क्वारंटीमध्ये असलेल्यांपैकी चार जणांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. (प्रतिनिधी)
हायरिस्क झोनमधील नागरिकांचे तपासणीस सहकार्य
शहरातील हायरिस्क झोनमध्ये १२ नगरे येत असून प्रारंभी करण्यात आलेल्या तपासणीत ५६ जणांना सर्दी, ताप असल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. या व्यक्ती कोरोना संदीग्ध रुग्ण असल्याचे वाटत नाही. त्याउपरही आरोग्य विभाग त्यांना मॉनिटरींग करत आहे. त्यामुळे यात काही अडचण नाही. सोबतच मृत व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या चारही व्यक्ती त्याच्या थेट संपर्कातील असल्याने कोरोना संसर्गाचे ट्रेसिंग करणे शक्य होत आहे.