Continuous online training for secondary teachers started in Buldana district! | बुलडाणा जिल्हयात माध्यमिक शिक्षकांसाठी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण सुरू!
बुलडाणा जिल्हयात माध्यमिक शिक्षकांसाठी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण सुरू!

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: माध्यमिक शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाच्या दृष्टिकोनातून मागील तीन वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण अशा अविरत आॅनलाइन प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा दिनांक ५ नोव्हेंबर पासून राज्यभर सुरू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १०४३ माध्यमिक शिक्षक व २५ तालुका मास्टर ट्रेनर्स या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. ४ डिसेंबर २०१९ रोजी अविरत-३ आॅनलाईन प्रशिक्षण पूर्णत्वास येणार आहे. 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण होत असून, बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत हे प्रशिक्षण माध्यमिक शिक्षकांसाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आॅनलाइन राबविले जात आहे. मानवी मेंदूची ओळख, अभ्यास करण्याच्या पद्धती,तणावमुक्त अध्ययन ,व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन या विषयांसह जीवनविषयक सकारात्मक बदल समजून घेत किशोरवयीन मुलांच्या वर्तनविषयक समस्या जाणून त्यावर उपाय योजनांचा समावेश या आॅनलाइन प्रशिक्षणात करण्यात आलेला आहे .अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी या योजनेत मोबाईल अ‍ॅपद्वारे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक -शिक्षिका प्रशिक्षणार्थी व मास्टर ट्रेनर्स सहभागी झालेले आहेत. अविरत-३ या आॅनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पाच मॉड्यूल देण्यात आले असून त्यामध्ये विविध माहितीपट, आॅडिओ-व्हिडिओ प्रकल्प, स्वमत आणि प्रश्नावली अशी पायरी पद्धत वापरण्यात आली आहे. कमी वेळात योग्य पर्याय निवडणाºया प्रशिक्षणार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कास्य ही आभासी सन्मान पदके मिळणार आहेत. त्यामुळे हे अविरत आॅनलाइन प्रशिक्षण सर्व माध्यमिक शिक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
        बुलडाणा जिल्ह्यातील अविरत-१ व अविरत-२ आॅनलाईन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या माध्यमिक शिक्षकांसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास  संस्था बुलडाणाचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनात  व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्यावतीने या प्रशिक्षणाचे समन्वयन केले जात आहे .
     

 
प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांमध्ये नवीन दृष्टीकोन!

 आधुनिक जीवनशैलीत किशोरवयीन मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांमध्ये नवीन दृष्टिकोन निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करत असतानाच मानसशास्त्रीय विश्लेषणातून विवेकनिष्ठ उपचार पद्धती अवलंबणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. व्यक्तीच्या भावना आणि वर्तनामध्ये दीर्घकाळ टिकणारे परिवर्तन घडवून आणून आनंददायी जीवन कसे जगता येईल  तसेच शिक्षक म्हणून आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करता येईल याचे मार्गदर्शन या प्रशिक्षणातून शिक्षकांना करण्यात येत आहे .      

 
विहित मुदतीत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन!
 या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाºया तज्ज्ञ शिक्षकांना विशेष महत्त्व असून प्रशिक्षित शिक्षक हे आपल्या शाळांमध्ये माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन करण्यासाठी सुलभकाची भूमिका बजावत आहेत. सर्व सहभागी शिक्षकांना दि. ४ डिसेंबर २०१९ पर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे. जिल्हा समन्वयक विभागप्रमुख तथा वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ .रवी जाधव यांचे मार्गदर्शनात  जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे व प्रवीण वायाळ हे प्रशिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहेत. प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी विहित मुदतीत प्रशिक्षण पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांनी केले आहे .

 
माध्यमिक शिक्षकांसाठी रंजक व नाविण्यपूर्ण पध्दतीने सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची संधी अविरत-३ या आॅनलाईन प्रशिक्षणात प्राप्त झाली आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग शिक्षकांनी आपल्या दैनंदिन अध्यापनात करावा.
-डॉ. रवी जाधव
जिल्हा समन्वयक
अविरत तथा वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट, बुलडाणा.

Web Title: Continuous online training for secondary teachers started in Buldana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.