पुढील आठवड्यात होणार कोविड रुग्णालय उभारण्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:34 IST2021-04-27T04:34:55+5:302021-04-27T04:34:55+5:30
सिंदखेडराजा मतदारसंघातील कोरोना रुग्णांना सध्या जालना, औरंगाबाद येथील सरकारी किंवा खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागते. सद्य परिस्थितीत येथे बेड ...

पुढील आठवड्यात होणार कोविड रुग्णालय उभारण्याच्या कामाला सुरुवात
सिंदखेडराजा मतदारसंघातील कोरोना रुग्णांना सध्या जालना, औरंगाबाद येथील सरकारी किंवा खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागते. सद्य परिस्थितीत येथे बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. दरम्यानच्या काळात या भागात रुग्ण वाढत आहेत. आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. अशा परिस्थितीत सिंदखेडराजा येथे अद्ययावत रुग्णालय आवश्यक असल्याने त्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. त्यापूर्वी योग्य जागेची पाहणी करण्यात आली आहे. सध्या असलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे १० बेडची मागणी असून ६० अतिरिक्त बेड येथे देण्यात यावे, असे प्रस्तावात स्पष्ट केले आहे. तर जालना रस्त्यावरील जिजाऊ महिला रुग्णालयात अद्ययावत कोविड रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. १५ दिवसांपूर्वी यासंदर्भातील चर्चा सुरू होती. दरम्यान, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देखील यासाठी पुढाकार घेतला असून सिंदखेडराजा प्रशासनाकडून पाठविला गेलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर केला गेला आहे. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ. नितीन तडस यांनी दिली आहे.