परवानगी नसताना केले पुलाचे बांधकाम

By Admin | Updated: February 27, 2015 01:09 IST2015-02-27T01:09:10+5:302015-02-27T01:09:10+5:30

मलकापूर येथे दोन किलोमीटरच्या परिसरात आठ पूल असतानाही नवव्या पुलाची निर्मिती.

Construction of bridge made without permission | परवानगी नसताना केले पुलाचे बांधकाम

परवानगी नसताना केले पुलाचे बांधकाम

विजय वर्मा / मलकापूर (जि. बुलडाणा): पाटबंधारे विभागाची परवानगी न घेताच येथील मोहनपुरा ते मदारटेकडीला जोडणार्‍या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे; मात्र आता हे बांधकाम तांत्रिक अडचणीत सापडल्याने बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन किमी. परिसराचे अंतरात आठ पूल असताना नवव्या नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नगर परिषदेचा सुरू असलेला मनमानी कारभार समोर येत आहे. शहरातून वाहत जाणार्‍या नळगंगा नदीवर बोदवड पुलापासून ते रेल्वे पुलापर्यंत १ ते २ कि.मी. अंतरात पारपेठ, सालीपुरा, काशीपुरा या भागाशी संपर्क करण्याकरिता सध्या आठ पूल अस्तित्वात आहेत. असे असतानाही आणखी काही पूल निर्माण करण्याची योजना नगर परिषदने आखली आहे. नळगंगा नदीवर ५0 ते ६0 वर्षांपूर्वी फक्त चार पूल होते. पारपेठमध्ये वाहने जाण्यास मोठा व छोटा पूल निकामी असल्याने मोठय़ा पुलाच्या बाजूला नगराध्यक्षपदी विनयकुमार मुंधडा असताना एक लहान पुलाची निर्मिती तसेच सालीपुरा येथे जाण्यासाठी बारादरी ते सालीपुरा या पुलाची निर्मिती करण्यात आली होती; मात्र दोन्ही पुलावरून पावसाळ्याच्या दिवसात रहदारी करणे अशक्य आहे, तर मागीलवर्षी मंगलगेटवरून काशीपुरा व बोदवड रस्त्यावर जाण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातच नुकतेच छोट्या पुलाच्या १५ फूट अंतरावर छोटा बाजार ते पारपेठला जोडणार्‍या नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, तर बडा हनुमान मंदिर ते पारपेठ व मोहनपुरा ते मदार टेकडीला जोडण्यात येणार्‍या नवीन पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे; मात्र त्याचे अंदाजपत्रक व नगर परिषदेच्यावतीने नवीन पुलाच्या निर्मितीसाठी सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलेले असल्याने भविष्यात या कामासाठी करोडो रुपये खर्च होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नगर परिषद प्रशासनाने मलकापूर येथील नळगंगा नदीही पाटबंधारे विभाग यांच्या अखत्यारित असतानासुद्धा त्या विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मलकापूर येथील नळगंगा नदीवर मोहनपुरा ते मदार टेकडी या भागात पूर्वी पुरातन काळातील छोट्या पुलाशेजारी लाखो रुपये खर्चुन ९ व्या पुलाचे निर्माण कार्य सुरु केले आहे. या पुलाअगोदर आठ पूल नदीपात्रात असतानासुद्धा कोणत्याही प्रकारची गरज नसताना या पुलाची निर्मिती नगर परिषद प्रशासन करीत आहे. नळगंगा नदीला पावसाळ्यात येणार्‍या पुराच्या पाण्याचा प्रवाह या पुलाच्या निर्मितीमुळे बदलून येणार्‍या पुराचे पाणी शहरात घुसून जनतेच्या आर्थिक व जीवित हानीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे या पुलाच्या निर्मितीमागे खरा उद्देश कोणता, याच्या चौकशीची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Construction of bridge made without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.